श्रीगोंदा | ११.७ | माधव बनसुडे
डोंबिवली येथे डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त करत डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम (Doctor Protection Act) प्रभावीपणे राबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आले.
(Doctor Protection Act) निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी हे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा अत्यावश्यक घटक असून ते दिवसरात्र रुग्णसेवेसाठी कार्यरत असतात. उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंती किंवा प्रतिकूल परिणामांच्या पार्श्वभूमीवर कायदा हातात घेऊन डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. अशा हिंसक घटनांमुळे केवळ डॉक्टरांचे मनोबल खच्ची होत नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्य रुग्णांच्या हितालाही बाधा पोहोचते.
(Doctor Protection Act) श्रीगोंदा शहर व परिसरातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात सेवा देता यावी, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
हे ही वाचा : नॅशनल मेडिकल कमिशन वेबसाईट पहा
यावेळी मागण्या करण्यात आल्या की, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियमाची कठोर आणि प्रभावी अंमलबजावणी करावी. डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी किंवा रुग्णालयांवर हल्ला करणाऱ्या तसेच धमक्या देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. डॉक्टर आणि पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी अधिकृत संपर्क अधिकारी किंवा तातडीची संपर्क व्यवस्था निर्माण करावी. डॉक्टर संरक्षण कायद्याबाबत रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
यावेळी श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनचे चे अध्यक्ष डॉ. मोहनराव लबडे यांनी सांगितले की, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्ण यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. समाजाला अखंड, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वैद्यकीय क्षेत्र पार पाडत असून, त्यासाठी सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या निवेदनावर श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी डॉ. राजेश पाखरे, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. बबन चव्हाण, डॉ. विक्रम कसरे, डॉ. राजेंद्र सिदनकर, डॉ. संतोष मोटे, डॉ. रविराज मचे, डॉ. चैताली मखरे, डॉ. मखरे, डॉ. अनिल कोकाटे, डॉ. पांडुरंग दातीर, डॉ. संजय टकले, डॉ. निलेश पाटील, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर उपस्थित होते.
🩺 डॉक्टरांवरील हल्ले थांबवा!
डोंबिवलीतील घटनेचा श्रीगोंदा मेडिकल असोसिएशनचा तीव्र निषेध. डॉक्टर संरक्षण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह हल्लेखोरांवर तातडीने कारवाईची मागणी. संपूर्ण बातमी वाचा फक्त रयत समाचार वर.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



