मुंबई | १८ नोव्हेंबर | दिपक शिरसाठ
Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ६,५०० ते ७,९०० रुपये दर मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी हे आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.
महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. हिरालाल परदेशी आणि राज्य सरचिटणीस कॉ. अशोक सोनारकर यांनी याबाबत माहिती दिली. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ऊस दर निश्चित करावा, १०.२५ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ६,५०० रुपये आणि १२.२५ टक्के साखर उताऱ्याला प्रतिटन ७,९०० रुपये दर द्यावा, अशी किसान सभेची मागणी आहे.
याशिवाय साखर कारखान्यांच्या उपउत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नातील ७५ टक्के वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा आणि साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करावेत, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी केली आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


