Miss Cynthia Farrar: अहिल्यानगर ही भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री, देशातील पहिल्या मुलींची शाळा आजही दुर्लक्षित; कॉमेनवेल्थचे कमलेश शर्मा यांची सिंथिया फॅरार कबरीस भेट  - Rayat Samachar

Miss Cynthia Farrar: अहिल्यानगर ही भारतातील स्त्री शिक्षणाची गंगोत्री, देशातील पहिल्या मुलींची शाळा आजही दुर्लक्षित; कॉमेनवेल्थचे कमलेश शर्मा यांची सिंथिया फॅरार कबरीस भेट 

rayatsamachar
3 Min Read

अहिल्यानगर | २०.११ | रयत समाचार

Miss Cynthia Farrar: अमेरिकन मिशनरी मिस सिंथिया फॅरार यांनी भारतातील मुली आणि महिलांची पहिली शाळा तत्कालिन अहमदनगरमध्ये सुरू केली होती. तथापि क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याला प्रेरक ठरलेली देशातील शिक्षणाची गंगोत्री असलेली देशातील पहिली मुलींची शाळा आजही दुर्लक्षित असल्याची खंत भारताचे विविध देशांमधील माजी राजदूत आणि ५६ देशांचा समावेश असलेल्या कॉमेनवेल्थ संघटनेचे निवृत्त सेक्रेटरी जनरल कमलेश शर्मा यांनी व्यक्त केली.

आज ता.२० रोजी शर्मा यांनी बुऱ्हाणनगर रस्त्यावरील ख्रिस्ती दफनभूमी येथे सावित्रीबाईंच्या शिक्षिका असलेल्या मिस् सिंथीया फॅरार यांच्या कबरीस भेट देऊन अभिवादन केले. शर्मा यांनी यावेळी अहिल्यानगरमधील इतिहासप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद केला. त्यांच्या समवेत मुंबईच्या प्रसिद्ध आर्की. किरण पत्की उपस्थित होत्या.

Miss Cynthia Farrar

यावेळी शर्मा म्हणाले की, ‘सिंथिया इज बिग हिरो इन एज्युकेशन’ असून त्यांनी तत्कालिन अहमदनगरमधे सुरू केलेली ‘फॅरार शाळा’ म्हणजेच आत्ताची ‘क्लेरा ब्रूस हायस्कूल’ ही बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे ऐकतो. ही फार मोठी शोकांतिका आहे. ही शाळा बंद पडू नये ही आपली सर्वांची मागणी आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून लक्ष दिले पाहिजे. आपण पुढाकार घेऊन या शाळा पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. भारतीय शिक्षणाचा संपन्न आणि समावेशक वारसा जपावा, अशी अपेक्षा शर्मा ज्यांनी व्यक्त केली.
शर्मा पुढे म्हणाले, फॅरार यांची शाळा असलेली ‘क्लेरा ब्रूस हायस्कूल’ व बॉईज हायस्कूल यांचे रूपांतर शासनाच्या शिक्षण विभागाने आदर्श राष्ट्रीय शैक्षणिक संकुलात केले पाहिजे. शाळा बंद पडू न देता तिचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे. ‘एज्यूकेशन मॉडेल स्कूल’ केले पाहिजे. येथे वंचित घटक आणि मुलींसाठी दर्जेदार गुणवत्तायुक्त शिक्षणाचे नवनवे प्रयोग केले जातील, असे राष्ट्रीय शिक्षण केंद्र येथे उभारले जायला हवे. यंदाचे वर्ष हे केंद्र सरकार व राज्य सरकारने ‘महात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्ष’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरे करत आहे. यंदाचे वर्ष या उपक्रमासाठी औचित्यपूर्ण आहे, असेही शर्मा म्हणाले.
 शर्मा पुढे म्हणाले की, भारतातील शिक्षणाच्या सुरूवातीच्या काळातील मुंबई व तत्कालिन अहमदनगर येथे मुलींची शाळा सुरू करणाऱ्या व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका असलेल्या मिस् सिंथिया फॅरार यांची कबर कोणाला सापडत नव्हती. यासंदर्भात शोध मोहीम राबवल्यावर ता. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंथिया यांची कबर इतिहासप्रेमींनी शोधली. इतिहास आणि संस्कृतीबद्दल आस्था आणि आपुलकी बाळगणाऱ्या या संशोधकांचे योगदान ऐतिहासिक महत्त्वाच्या आहे असे शर्मा म्हणाले.
रेव्हरंड जनार्दन वाघमारे, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, इतिहासप्रेमी मंडळाचे संशोधक इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, असिफखान दुलेखान, संध्या मेढे, भैरवनाथ वाकळे, पंकज गुंदेचा, दिपक शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते विकास सुतार आदी यावेळी उपस्थित होते.
हे हि वाचा :   सावित्रीबाईंच्या शैक्षणिक वारशाची शाळा वाचवा! सिंथिया फॅरार ते क्लेरा ब्रुस : अहिल्यानगरच्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेचे भवितव्य काय? ऐतिहासिक शाळेला ‘आदर्श मॉडेल स्कूल’ चा दर्जा द्या

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading