अहमदनगर | २२ जून | रयत समाचार
महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ मधील नागरिकविरोधी तरतुदींविरोधात आज सोमवारी ता. २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता नगरमधील वाडिया पार्कमधील महात्मा गांधी स्मारकासमोर जनआंदोलन (RTI Protest) आयोजित करण्यात आले आहे. माहितीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
(RTI Protest) आंदोलनाच्या आयोजकांच्या मते, नव्या नियमांमधील अनेक तरतुदी या मूळ माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या उद्देशालाच छेद देणाऱ्या आहेत. अर्ज शुल्क, प्रथम व द्वितीय अपील शुल्क तसेच माहितीच्या प्रतींसाठीचे शुल्क वाढविणे, माहिती मागविण्याचे कारण नमूद करण्याची सक्ती, ओळखपत्र जोडणे अनिवार्य करणे, ‘एक विषय, एक अर्ज’ ही अट, पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याची तरतूद तसेच सुनावणीला गैरहजर राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद यामुळे सामान्य नागरिकांसाठी माहिती मिळविण्याची प्रक्रिया अधिक खर्चिक, क्लिष्ट आणि कठीण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
(RTI Protest) आयोजकांचे म्हणणे आहे की, माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाला जाब विचारण्याचे प्रभावी साधन आहे. हा कायदा नागरिकांना सक्षम करण्यासाठी अस्तित्वात आला असताना, नव्या नियमांमुळे नागरिकांना माहितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नियमांच्या माध्यमातून मूळ कायद्याच्या अधिकारांमध्ये मर्यादा आणून माहितीच्या अधिकाराची धार बोथट करण्याचे काम होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
माहिती मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत आणि मानवी हक्क असून, नव्या नियमांमुळे या हक्काची पद्धतशीर पायमल्ली होण्याची शक्यता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकविरोधी सर्व तरतुदी तातडीने रद्द कराव्यात, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.
“माहितीचा अधिकार हा उपकार नाही, तो नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे,” असा संदेश देत माहितीच्या अधिकाराचा वापर केलेल्या तसेच पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची अपेक्षा असलेल्या प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे आवाहन ॲड. श्याम आसावा, शाकीर शेख, अशोक सब्बन आणि भैरवनाथ वाकळे यांनी केले आहे. “माहिती वाचवा, लोकशाही वाचवा” हा संदेश देत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




