अहमदनगर | २२.४ | रयत समाचार
(Social) महाराष्ट्रात सुरू असलेल्या कर्मचारी आंदोलनाला आता सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातूनही जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड यांनी एक संवेदनशील नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनाला सक्रिय समर्थन जाहीर केले आहे. काळापहाड यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्टपणे सांगितले की, हा लढा केवळ कर्मचाऱ्यांचा नाही, तर त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याचा आहे. विशेषतः कर्मचारी नेते अशोक सूर्यभान मासाळ यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने ते भावूक झाल्याचे त्यांनी नमूद केले.
(Social) अशोक मासाळ यांनी आपल्या मागण्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिल्याची घटना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. यावर प्रतिक्रिया देताना काळापहाड म्हणाले, हे केवळ एक पत्र नाही, तर व्यवस्थेने पिचलेल्या लाखो कुटुंबांचा आक्रोश आहे. एका कर्मचाऱ्यावर अशी वेळ येणे, हीच आंदोलनाची तीव्रता दर्शवते.
(Social) ते पुढे म्हणाले, पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, ती कुणी दिलेली भीक नाही. माझे वडील स्वतः सरकारी कर्मचारी होते. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या सन्मानाच्या आयुष्याच्या मागे पेन्शन हा मोठा आधार आहे. जर आजच्या कर्मचाऱ्यांना हा आधार नसेल, तर त्यांनी कोणत्या भरोशावर सेवा करावी?
अहिल्यानगरसह राज्यभरातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयांवर ठिय्या देऊन आपल्या हक्कांसाठी लढा देत आहेत. उन्हात उभे राहून दिला जाणारा हा संघर्ष व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास काळापहाड यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी सर्व कर्मचारी बांधवांना आवाहन करत म्हटले, हा लढा तुमच्या अस्तित्वाचा आहे. यात डगमगू नका. अशोक मासाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वज्रमुठ अशीच घट्ट राहू द्या. या आंदोलनाला आता व्यापक लोकसमर्थन मिळण्याची चिन्हे दिसत असून, शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

