नवी दिल्ली | ३०.७ | रयत समाचार
(Delhi Marathi Film Festival) देशाच्या राजधानीत प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी महाराष्ट्र सदन येथे झालेल्या बैठकीत घेतला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये हा तीन दिवसीय महोत्सव रंगणार असून, मराठी चित्रपटसृष्टीची सांस्कृतिक समृद्धी राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार आहे.
(Delhi Marathi Film Festival) बैठकीला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, विवेक गर्गे, नितीन सरदारे, अभिजित गोडबोले, रामदास चव्हाणके, राजकुमार महाजन, तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल उपस्थित होते. चित्रपट प्रदर्शन, मान्यवरांचे स्वागत, प्रेक्षक व्यवस्थापन, नोंदणी प्रक्रिया, तांत्रिक सुविधा, प्रसिद्धी, सुरक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
(Delhi Marathi Film Festival) महोत्सवाचे आयोजन दर्जेदार आणि संस्मरणीय व्हावे, यासाठी सर्व आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी संबंधितांना दिल्या.
‘सिनेमा • संस्कृती • संवाद’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव मराठी चित्रपटांच्या आशयवैविध्याची ओळख देशभरातील रसिकांना करून देणार आहे. महोत्सवाची सुरुवात बहुप्रतीक्षित ‘देऊळ बंद-2’ या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाने होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले ‘स्थळ’, ‘घबाडखुंड’ यांसह अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. इतर भाषिक प्रेक्षकांनाही मराठी चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी सर्व चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह दाखविण्यात येणार आहेत.
चित्रपट प्रदर्शनाबरोबरच नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधीही या महोत्सवात मिळणार आहे. भीम सभागृहात उद्घाटन, समारोप आणि प्रमुख चित्रपटांचे प्रदर्शन होईल, तर नालंदा सभागृहात पटकथा लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन विषयावरील मास्टरक्लास व कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. समरसता सभागृहात माहितीपट, लघुपटांचे प्रदर्शन आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध पैलूंवरील चर्चासत्रेही होणार आहेत.
महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असला तरी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. २९ जुलैपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, अधिकृत संकेतस्थळ किंवा क्यूआर कोडद्वारे आगाऊ नोंदणी करून आपले स्थान निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
🎬 राजधानी दिल्लीत प्रथमच मराठी चित्रपटांचा भव्य महोत्सव! ७ ते ९ ऑगस्टदरम्यान ‘देऊळ बंद-2’सह अनेक दर्जेदार चित्रपट, मास्टरक्लास आणि चर्चासत्रांची मेजवानी. संपूर्ण बातमी वाचा रयत समाचारवर. #MarathiCinema #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



