नवी दिल्ली | १५.४ | रयत समाचार
(Literature) प्रशासकीय सेवेतून मिळणाऱ्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण अनुभवांचे संचित केवळ वैयक्तिक पातळीवर न ठेवता ते साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर मांडणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. प्रशासनातील संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच कामाचा ताण हलका करण्यासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
(Literature) नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन आणि ‘सरहद’ संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी महिला प्रशासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार समारोप झाला. या वेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
(Literature) यावेळी संमेलनाध्यक्षा तथा निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, स्वागताध्यक्षा सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, मुख्य संयोजक सुषमा संजय नहार, कार्यवाह श्रीमती पगारिया आणि सहसंयोजक लेशपाल जवळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विजया रहाटकर यांनी महिला अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कौशल्यासोबतच त्यांच्या दडलेल्या साहित्यिक प्रतिभेचे कौतुक केले. राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराराणी यांच्या आदर्श राज्यकारभाराचा वारसा आजच्या महिला अधिकारी समर्थपणे पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजातील सामाजिक आर्थिक अनुभव जेव्हा कथा किंवा कवितेतून व्यक्त होतात, तेव्हा ते देशाच्या परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतात, असेही त्या म्हणाल्या. ग्रामीण प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी लेखणीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्वागताध्यक्षा सुप्रिया देवस्थळी यांनी आपल्या मनोगतातून महिला अधिकाऱ्यांच्या प्रवासाचा आढावा घेतला. प्रशासकीय कामकाजाच्या चौकटीत न राहता समाजाचे वास्तव लेखनातून मांडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. परराष्ट्र सेवेतील प्रतिभा बारकर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे यांनी अधिकाऱ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्याचे आवाहन करत, आपण २४ तास ‘कॉल ऑन ड्युटी’ असलो तरी लेखक आणि संवेदनशील नागरिक म्हणून व्यक्त होणे आवश्यक आहे, असे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा, विशेषतः युनिकोडचा प्रभावी वापर करण्याचेही त्यांनी सुचविले.
निवासी आयुक्त आर. विमला यांनी प्रशासन आणि साहित्य यांचा संगम समाजाला अधिक संवेदनशील आणि न्यायपूर्ण दिशा देतो, असे सांगितले. संत तुकारामांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी लेखणी सतत प्रवाही राहण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमात संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निरजा आपटे यांनी, तर आभार प्रदर्शन लेशपाल जवळगे यांनी केले.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनामुळे प्रशासकीय जबाबदारी आणि सृजनशीलता यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. देशभरातील ज्येष्ठ महिला प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

