Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

प्रशासकीय कणखरतेसोबतच साहित्याचा जागर

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | ११.४ | रयत समाचार

(Literature) प्रशासकीय चौकटीत राहून जनसेवेचे व्रत जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या संवेदनशील लेखणीचा आविष्कार आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाला. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त ‘सरहद, पुणे’ आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘मराठी भाषा विभागा’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा प्रारंभ दिल्लीत अत्यंत उत्साहात आणि भव्य ‘ग्रंथदिंडी’ने झाला.

Literature

(Literature) संमेलनाची सुरुवात साहित्याचा वारसा सांगणाऱ्या भव्य ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि इतर साहित्याचे ‘विधिवत पूजन’ संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय सह महालेखाकार सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, क्रांती खोब्रागडे नॅशनल बुक ट्रस्टच्या सचिव युवराज मलिक यांसह अनेक वरिष्ठ महिला प्रशासकीय अधिकारी उपस्थित होत्या. पारंपारिक वेशभूषा आणि साहित्याचा जयघोष यामुळे दिल्लीचा परिसर मराठीमय झाला होता.

(Literature) संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला : महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही आपल्या मुलाखतीत प्रशासकीय प्रवासातील रंजक पैलू उलगडले. पोलीस दलातील आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना साहित्याने मला नेहमीच आधार दिला,असे त्या म्हणाल्या.
बिहारमधील शालेय शिक्षणापासून ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पोलीस पदापर्यंतचा प्रवास मांडताना त्यांनी शिक्षणातील कष्टांचे महत्त्व अधोरेखित केले. जमाबंदी आयुक्त म्हणून काम करताना जमिनीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची मानवी बाजू साहित्यातून मांडण्याची ओढ नेहमीच वाटली,असे त्यांनी नमूद केले. संस्कृत श्लोकांचा आधार घेत त्यांनी ‘कर्तृत्वावर भर देणे’ हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
प्रशासकीय जबाबदारीला संवेदनशील लेखणीची जोड- लीना मेहंदळे : संमेलनाच्या मुख्य सत्रात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखिका लीना मेहंदळे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, प्रशासकीय खुर्चीवर बसून केवळ फायली निकाली काढणे म्हणजे कर्तव्य नव्हे, तर त्या पदाचा वापर समाजातील अनिष्ट प्रथा मुळापासून उपटण्यासाठी करणे हीच खरी लोकसेवा आहे.
मेहंदळे यांनी सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्मूलनासाठी दिलेल्या धाडसी लढ्याचा अनुभव सांगितला. देवीच्या कोपाची भीती झुगारून मी कायद्याचे रक्षण केले आणि त्या महिलांच्या मुलांचे पुनर्वसन केले, याचे मला मोठे समाधान आहे,असे त्या भावूक होऊन म्हणाल्या. भौतिकशास्त्राची शिस्त आणि साहित्याची संवेदनशीलता यांचा मेळ घालत त्यांनी कामाचा ताण न घेता आनंदाने काम करण्याचा सल्ला उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.
या विशेष मुलाखत सत्राचे संचलन ज्येष्ठ पत्रकार मृणाल नानिवडेकर आणि माजी माहिती संचालक श्रद्धा बेलसरे यांनी केले. या संमेलनात प्रशासनातील क्लिष्टता, विज्ञानाची शिस्त आणि साहित्याचा ओलावा यांचा एक अनोखा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला स्मिता शेलार, मनीषा पिंगळे, प्रिती पगारिया, सुषमा नहार यांसह विविध विभागांतील महिला अधिकारी, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय चौकटीपलीकडे जाऊन साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचा निर्धार या संमेलनात व्यक्त करण्यात आला.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading