अहिल्यानगर | प्रतिनिधी
Lakshmi Aai Yatra: नगर तालुक्यातील नेप्ती गावात श्रद्धा, एकता आणि परंपरेचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला. गावातून लोकवर्गणी गोळा करून सर्वांना सोबत घेत गोपीनाथ होळकर यांच्या पुढाकारातून लक्ष्मीआईची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रा कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
लक्ष्मीआई यात्रेनिमित्त मंदिर परिसर फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेचा मुख्य सोहळा असलेली मिरवणूक दुपारी ४ वाजता गावातून मोठ्या दिमाखात निघाली. मिरवणुकीच्या अग्रभागी संबळ, हलगी, ढोल-ताशा आणि सनईच्या वाद्यांनी वातावरण भक्तिमय केले होते. पारंपरिक वेशभूषेतील पोतराजांनी अंगावर आसूड ओढत भक्तीचा नजराणा सादर केला. आसूडाचा “चट्ट… चट्ट…” आवाज घुमताच परिसरात लक्ष्मीआईच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत डोक्यावर कलश घेतले होते. हातात नारळ, पेढे आणि फुलांच्या ताटांसह महिला “लक्ष्मीमाता की जय”चा जयघोष करत मिरवणुकीत सहभागी झाल्या.

गावातील मुख्य चौक आणि बाजारपेठ मार्गे मिरवणूक लक्ष्मीआई मंदिरात पोहोचली. ग्रामस्थ आणि साळवे परिवाराच्या वतीने पोपट साळवे यांच्या हस्ते लक्ष्मीआईला गंगाजलाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस पीक यावे, यासाठी लक्ष्मीआईला साकडे घातले. तसेच लक्ष्मीआई मंदिराचे बांधकाम सुरू असून, या कामासाठी दानशूर भाविक आणि ग्रामस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.
नेप्ती गावातील लक्ष्मीआईची यात्रा ही जुनी परंपरा असून दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होतात.
यावेळी गोपीनाथ होळकर म्हणाले, “लक्ष्मीआई ही फक्त आपली कुलदेवता नाही, तर नेप्ती गावचा प्राण आहे. आज आपण सर्व जाती-धर्म विसरून एकत्र आलो, हेच या यात्रेचे खरे यश आहे. शेतकऱ्यांच्या शेतात धनधान्य पिकावे, प्रत्येकाच्या घरात सुख-शांती आणि आरोग्य नांदावे, हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे.”
“ही यात्रा केवळ एक दिवसाची नाही, तर आपल्या संस्कृतीचे जतन करणारी परंपरा आहे. मंदिराचे भव्य बांधकाम सुरू असून त्यासाठी सर्वांनी मदत करावी. लक्ष्मीआईच्या कृपेने गावात सुख-समृद्धी येवो,” असेही गोपीनाथ होळकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, महिला, ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
नेप्तीच्या या यात्रेने पुन्हा एकदा “एक गाव, एक मन, एक श्रद्धा” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवले.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


