नगर तालुका | रयत समाचार
(Religion) तालुक्यातील नेप्ती येथे श्रीराम नवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नवनाथ संगीत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरासमोर हा भव्य सोहळा सुरू असून यंदा या परंपरेचे ३७ वे वर्ष साजरे होत आहे. सोहळ्याच्या निमित्ताने श्रीराम विजयग्रंथ व ज्ञानेश्वरी पारायणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
(Religion) कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुवर्य औघड पीर मलंगनाथजी महाराज व गुरुवर्य मस्तनाथजी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. प्रतिमापूजन व ग्रंथपूजनाने कथेची भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.
(Religion) नवनाथ कथा ज्ञानयज्ञासाठी कृष्ण कृपाकिंत ह.भ.प. डॉ. विकासानंदजी महाराज मिसाळ (संत पंढरी) यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्य ह.भ.प. प्रेमानंदजी महाराज आंबेकर शास्त्री (टाकळी ढोकेश्वर) हे कथा प्रवक्ते आहेत. कथेची वेळ दररोज रात्री ८ ते ११ अशी ठेवण्यात आली असून २० मार्च ते २७ मार्च दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
कथेला गायक ह.भ.प. रोहिदास जाधव महाराज (राहुरी), सिंथेसायझर वादक अमोल पानमंद महाराज (खरवंडी), तबला वादक ह.भ.प. सोमनाथ महाराज यशवंते तसेच बासरी वादक बाबासाहेब भोर यांची सुरेल साथ लाभत आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता नेप्ती भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठाचे आयोजन करण्यात येत आहे.
सोहळ्यानिमित्त २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रामजन्माचे कीर्तन होणार असून २७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. काल्याचे अन्नदाते रावसाहेब भागीनाथ होळकर हे आहेत. ज्ञानेश्वरी पारायणात महिला व पुरुष भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
या सोहळ्यामुळे संपूर्ण नेप्ती गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंदिर परिसराची स्वच्छता व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन फुले, उपाध्यक्ष बाळासाहेब होळकर यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने परिसरातील सर्व भाविकांनी सोहळ्यात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
