पुणे | ६.७ | रयत समाचार
(Govind Giri Statement) अयोध्या येथील जगप्रसिध्द राममंदिरातील चोरी प्रकरणानंतर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी यांनी ५ जुलै रोजी आपल्या अधिकृत सामाजिक माध्यम खात्यावर लेखी सफाई निवेदन प्रसिद्ध केले. “श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र (अयोध्या) कोषाध्यक्ष का रामभक्तों से निवेदन!” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या पोस्टवर काही तासांतच हजारो प्रतिक्रिया उमटल्या.
(Govind Giri Statement) गिरीसमर्थकांनी “जय श्रीराम”च्या घोषणा देत गिरी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर अनेक खऱ्या रामभक्तांनी थेट उत्तरदायित्व, आर्थिक जबाबदारी आणि नैतिकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
(Govind Giri Statement) पोस्टला सुमारे १.७ हजारांहून अधिक प्रतिक्रिया, २९९ हून अधिक कॉमेंट्स आणि २७६ शेअर्स मिळाल्याचे दिसून आले. प्रतिक्रियांचा अभ्यास करता, अनेक जणांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवस्थापनावर आणि कोषाध्यक्ष म्हणून गोविंदगिरी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विशेष म्हणजे, प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये विविध राज्यांतील शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, योग प्रशिक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित व्यक्तींचा समावेश असल्याचे दिसून येते.
प्रतिनिधिक प्रश्न आणि प्रतिक्रिया : पटणा (बिहार) येथील योगशिक्षक जितेंद्र कुमार यांनी लिहिले की, कोषाध्यक्षाचे मूळ कर्तव्य म्हणजे संस्थेच्या आर्थिक मालमत्तेची सुरक्षा, उत्पन्न-खर्चाचा हिशेब, अधिकृत देयके आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्था सुनिश्चित करणे होय. त्यांनी निवेदनातील सातव्या मुद्द्याचा संदर्भ देत विचारले की, “जर SOP बद्दल तुम्हाला गेल्या महिन्यातच माहिती झाली असेल, तर त्यापूर्वी कोषाध्यक्ष म्हणून कामकाज कसे चालले?”
कटिहार (बिहार) येथील ललन सुलतानिया यांनी टिप्पणी केली की, “सीतारामपासून सुरू झालेल्या पत्राचा शेवट जय श्रीरामने झाला; मात्र कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारीबाबत आपण अत्यंत परिष्कृत शब्दांत पल्ला झाडल्यासारखे वाटते.”
विनोद गांधी यांनी, “एकदा विश्वास उडाला की पुन्हा विश्वास ठेवता येत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.
गोरखपूरचे ब्रिजेश सिंह यांनी सर्व ट्रस्टींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता, असे मत व्यक्त केले तर
रोहतकचे ज्येष्ठ पत्रकार मनमोहन शर्मा यांनी म्हटले, “तुम्ही सफाई दिली आहे; काही भक्त त्यावर विश्वास ठेवतीलही. पण सर्वसामान्य सनातनी समाजाचा ट्रस्टींबद्दलचा विश्वास उरलेला नाही.”
आसाममधील भास्कर उपाध्याय यांनी लिहिले की, “प्रवचनासारखे पत्र लिहून जबाबदारीपासून दूर जाता येणार नाही. कोषाध्यक्ष म्हणून निधीच्या सुरक्षेची नैतिक जबाबदारी तुमचीही आहे. तर
नोयडाचे जितेंद्र पांडे यांनी कठोर शब्दांत इशारा देत म्हटले की, “आम्हाला फक्त हनुमानजींवर विश्वास आहे. प्रभूंचा कोणताही अपमान सहन केला जाणार नाही.”
गाझियाबादचे पुष्पेंद्र बैसला यांनी इंग्रजीत प्रतिक्रिया देत म्हटले, “It’s your responsibility, Gurudev Ji.”
हिंदू शक्ती परिषदेच्या राष्ट्रीय संयोजिका अंजू द्विवेदी घोळवे यांनी टिप्पणी केली की, “अशा संस्थांमध्ये कोषाध्यक्ष बँकेचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता नसतो, ही बाब सर्वपरिचित आहे.”
उत्तराखंडचे आलोक वर्मा यांनी थेट प्रश्न विचारला, “स्वामीजी, मग पद का सोडत नाही?” तर हिमांशू अग्रवाल (खतिमा) यांनीही, “इतरांप्रमाणे तुम्हीही राजीनामा का दिला नाही?” असा प्रश्न उपस्थित केला.
मध्यप्रदेशातील राजेंद्र व्यास यांनी नमूद केले की, “पत्राची भाषा उत्कृष्ट आहे; पण त्यामुळे तुमचे उत्तरदायित्व संपत नाही.”
ठाण्याचे विजय जोशी यांनी लिहिले, “अंधभक्ती नको, आता प्रोफेशनल सिस्टीम हवी.” तर लखनौचे मुकेश कुमार पांडे यांनी ट्रस्टने पाच कोटी रुपयांच्या रामचरितमानस ग्रंथाचे सार्वजनिक प्रदर्शन करून देशाचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी केली.
गुना (मध्यप्रदेश) येथील कैलाश मंथन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हिंदुत्वाच्या नावाखाली जर गैरप्रकार होत असतील तर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा इतिहासात हा काळा अध्याय ठरेल.”
समर्थनाच्याही प्रतिक्रिया : दुसरीकडे, गोविंद गिरी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर “जय श्रीराम”, “स्वामीजींवर पूर्ण विश्वास आहे” अशा प्रतिक्रिया देत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला. त्यामुळे या पोस्टवर समर्थन आणि टीका अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटल्याचे दिसून आले.
चर्चेचा केंद्रबिंदू ; उत्तरदायित्व : या संपूर्ण चर्चेतून एक मुद्दा ठळकपणे समोर येतो, कोषाध्यक्ष म्हणून आर्थिक व्यवस्थेतील उत्तरदायित्व कोण स्वीकारणार? सफाई निवेदनानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे रामभक्तांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे. ट्रस्टकडून या प्रश्नांवर अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरण येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



