श्रीरामपूर | ३०.७ | सलीमखान पठाण
(Shrirampur Property Tax) श्रीरामपूर नगरपालिकेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीमुळे मालमत्ताधारकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करत नगराध्यक्ष करण ससाणे यांनी विशेष शिक्षणकर आणि अग्निशमनकर पूर्णपणे रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांची घट होणार असली, तरी शहरातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(Shrirampur Property Tax) चतुर्थ वार्षिक कर आकारणीबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष कांचन सानप आणि मुख्याधिकारी मनोज उकिरडे मंचावर उपस्थित होते.
(Shrirampur Property Tax) नगरपालिकेने शहरातील ३२ हजार ९४८ मालमत्तांची कर आकारणी केली असून त्यापैकी ७ हजार ५०७ मालमत्ताधारकांनी हरकती नोंदवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन करप्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ससाणे यांनी सांगितले की, ही कर आकारणी करण्याचा ठेका २०२२ मध्ये तत्कालीन प्रशासनाने अमरावतीच्या एका संस्थेला दिला होता. या कामासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून यंदा हे काम पूर्ण झाले आहे.
शहरात यापूर्वी २०१४-१५ मध्ये शेवटची कर आकारणी करण्यात आली होती. तब्बल बारा वर्षांनंतर नव्याने कर आकारणी होत असली, तरी मागील वर्षांचा कोणताही थकीत कर आकारला जाणार नाही. नवीन कर आकारणी केवळ सन २०२६-२७ पासूनच लागू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील नागरिकांकडून अन्यायकारक पद्धतीने एक रुपयाही आम्हाला नको आहे. त्याचवेळी नगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ झाली पाहिजे, असे सांगत ससाणे यांनी २०२३ नंतर झालेल्या नव्या बांधकामांचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यांच्यावर घरपट्टी आकारली जाणार असल्याची माहिती दिली.
मालमत्ताधारकांना दोन टप्प्यांत नोटिसा देण्यात येणार असून दोन्ही वेळा त्यांना हरकत नोंदविण्याची संधी मिळणार आहे. अमरावतीच्या कंपनीने ज्या ठिकाणी चुकीची मोजमापे केली असतील ती दुरुस्त करण्यात येतील. तसेच व्यावसायिक मालमत्तांची चुकीची वर्गवारी अथवा कर आकारणी झाली असल्यास त्यातही आवश्यक बदल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील सर्व धार्मिक स्थळांना कोणतीही कर आकारणी केली जाणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र त्या जागांचा व्यावसायिक वापर होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मासिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा : विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रकल्प अहवाल सल्लागारांना निधी अदा करणे, १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खर्चास मंजुरी, अग्निशमन ट्रॅक्टर, स्वर्गरथ, टँकर, ट्रेलरसह जुनी वाहने निर्लेखित करणे, नगररचना विषयक प्रस्ताव, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त, कचराडेपोवरील आगप्रतिबंधक उपाययोजना, गोंधवणी येथील शाळा क्रमांक ५ ची जीर्ण इमारत निष्कासित करणे, बाजारतळ परिसरातील मटण मार्केट येथे भाजीमंडई विकसित करणे, २०२६-२७ मधील विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी तसेच विविध निविदांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेतील विषय क्रमांक ४२ अंतर्गत नवीन आर्थिक वर्षात हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांना कोणतीही चर्चा न करता सर्वानुमते प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
या चर्चेत नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, हाजी अंजूम शेख, आशिष धनवटे, दीपक चव्हाण, श्याम आढागळे, गटनेते हाजी मुजफ्फर शेख, स्नेहल खोरे, वैशाली चव्हाण, जितेंद्र छाजेड, दिलीप नागरे, संजय गांगड, राजेंद्र पवार यांच्यासह महिला नगरसेविकांनी सहभाग घेतला.
📢 श्रीरामपूरकरांसाठी मोठा दिलासा! विशेष शिक्षणकर आणि अग्निशमनकर पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली. नवीन कर आकारणी फक्त २०२६-२७ पासून लागू होणार. सविस्तर बातमी वाचा फक्त रयत समाचारवर. #Shrirampur #PropertyTax #Maharashtra #RayatSamachar
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


