पिंपरी चिंचवड | १३.६ | रयत समाचार
(Crime) फुगेवाडी विषारी दारूकांडात निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली. यापुढे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरू नसल्याचे दरमहा लेखी प्रमाणपत्र संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावे लागणार आहे.
(Crime) फुगेवाडीतील विषारी दारूमुळे पिंपरी चिंचवडमधील १२ जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातही काहींना जीव गमवावा लागला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी दापोडी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करत कठोर संदेश दिला.
(Crime) आता केवळ निलंबनावर कारवाई थांबलेली नसून संपूर्ण पोलिस यंत्रणेलाच जबाबदारीच्या चौकटीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हातभट्टी दारू, मटका, जुगार, अवैध दारू विक्री किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे आपल्या हद्दीत सुरू नसल्याचे लेखी प्रमाणपत्र प्रत्येक वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला द्यावे लागणार तसेच एसीपी आणि डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांना या प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हद्दीत अवैध धंदे सुरू असतील तर संबंधित अधिकारी जबाबदार धरला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्याने पोलिस दलात खळबळ उडाली.
जर एखाद्या अधिकाऱ्याने हद्दीत अवैध धंदा नसल्याचे प्रमाणपत्र दिले आणि नंतर प्रत्यक्षात अवैध धंदा सुरू असल्याचे आढळून आले, तर संबंधित अधिकाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
या निर्णयामुळे शहरातील अवैध धंद्यांवर प्रभावी आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांवर थेट जबाबदारी निश्चित झाल्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या हद्दीतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



