लातूर | १३.६ | रयत समाचार
(FDA) राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडण्याच्या तक्रारींवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेतली असतानाच, लातूर येथील सदासूख हॉस्पिटलच्या औषध खरेदी व्यवस्थेबाबत एका नागरिकाने सोशल मीडियावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
(FDA) दिव्या भूषण धोका-दर्डा यांनी केलेल्या पोस्टमध्ये, रुग्णांना औषधे कोठून खरेदी करायची याचा निर्णय घेण्याचा अधिकार असावा, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यांनी हॉस्पिटलच्या अंतर्गत मेडिकल स्टोअरमधूनच काही विशिष्ट औषधे उपलब्ध होत असल्याचा आरोप केला.
(FDA) पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार, Kaizyt हे औषध गेल्या पाच-सहा वर्षांपासून सदासूख हॉस्पिटलच्या अंतर्गत मेडिकलमधूनच खरेदी करावे लागत आहे. संबंधित औषधावर कोणतीही सवलत दिली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हे औषध इतर मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होत नसल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
धोका-दर्डा यांनी आपल्या आजी-आजोबांचा उपचारांशी असलेला भावनिक संबंध नमूद करताना, रुग्णांच्या भावनांचा गैरफायदा घेतला जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी दिवंगत ज्येष्ठ डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत सध्याच्या औषध पुरवठा व्यवस्थेवरही टीका केली आहे. तसेच ही पोस्ट कोणाची बदनामी म्हणून नव्हे तर प्रश्न समोर येण्यासाठी केल्याचे प्रांजळपणे नमूद केले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत सदासूख हॉस्पिटलकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. सोशल मीडियावरील या पोस्टमुळे रुग्णालयांमधील औषध खरेदीची पारदर्शकता, विशिष्ट मेडिकल स्टोअर्सशी असलेले संबंध आणि रुग्णांच्या निवडीचा अधिकार या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.
अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अशा तक्रारींची चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



