Politics: लंके-पवारांच्या 'गोड' बातम्या नेमक्या आहेत तरी कोणत्या ? 'जाणता राजा'ची थेट निवृत्ती ? - Rayat Samachar

Politics: लंके-पवारांच्या ‘गोड’ बातम्या नेमक्या आहेत तरी कोणत्या ? ‘जाणता राजा’ची थेट निवृत्ती ?

रयत समाचार वृत्तसेवा

हयातभर जोपासलेल्या तत्वांशी फारकत घेऊन आयुष्याच्या शेवटी शरद पवार असला अनपेक्षित निर्णय घेणारंच नाहीत

राज की बात

१५ डिसेंबर |राजेंद्र देवढे |विशेष प्रतिनिधी

०२ डिसेंबरला सुप्यात आणि ११ डिसेंबरला खर्डा येथे पार पडलेल्या (Politics) आभार सभांतून अनुक्रमे खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांनी लवकरच गोड बातम्यांचे संकेत दिले होते. यापैकी खासदार लंके यांनी एक महिन्याचा तर आमदार पवार यांनी दहा-बारा दिवसांचा अवधी दिला आहे. या दोन्ही जबाबदार लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांमुळे लोकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

   १२ डिसेंबरला नवी दिल्ली येथे शरद पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला. या दिवशी अजित पवार यांच्या कंपूतील काही (Politics) नेत्यांनी बंद दाराआड शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांचा गट अजित पवारांच्या गटात विलीन होणार असल्याच्या दंतवार्ता जनमाणसांत प्रसृत झाल्या. राजकारण हा मराठी माणसाचा आवडता विषय असल्याने त्या अजूनही चवीने चघळल्या जात आहेत. अनेक यू ट्युबर्स व राजकीय विश्लेषकही त्यांवर मतमतांतर व्यक्त करत आहेत. शरद पवार हे सक्रिय राजकारणातून लवकरच निवृत्त होणार असल्याची महत्वाची चर्चा यानिमित्ताने होत आहे. खऱ्या अर्थाने हीच महत्वाची चर्चा आहे. ज्या दंतवार्ता प्रसृत होत आहेत त्यातील कळीची दंतवार्ता हीच आहेत. कारण, शरद पवार राजकारणातून निवृत झाल्याशिवाय इतर अटकळींना ठोस आधार नाही. शरद पवार यांचा गट, अजित पवारांच्या गटात विलीन होऊन केंद्र सरकारात सहभागी होणार, ही बांधली जात असलेली सर्वात चर्चित अटकळ आहे.

शरद पवार यांचा गट, अजित पवारांच्या गटात विलीन होऊन केंद्र सरकारात सहभागी होणार असेल तर तो शरद पवार यांच्या निवृत्तीशिवाय होऊच शकत नाही. कारण, हयातभर जोपासलेल्या तत्वांशी फारकत घेऊन आयुष्याच्या शेवटी शरद पवार असला अनपेक्षित निर्णय घेणारंच नाहीत. ‘बहुत गयी थोडी रही, अब क्यूं ताल में भंग,’ या गोष्टीचा अन्वयार्थही त्यांना पुरेपूर माहित आहे. सहकाऱ्यांचा कितीही दबाव आला तरी जोपर्यंत ते राजकारणात सक्रिय आहेत तोपर्यंत असला अन्वयव्यतिरेक त्यांच्या हातून घडणार नाही. कारण, जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य ज्या काही बोटांवर मोजण्याइतक्या नेत्यांच्या नशीबी आलं त्यांतील शरद पवार हे शीर्षस्थानी आहेत. खासदार निलेश लंके व आमदार रोहित पवार यांना अभिप्रेत असलेली गोड बातमी ही ‘भाजपाबरोबर जाण्याची’ असलीच तर मात्र ‘शरद पवार हे निवृत्तीचा निर्णय घेणार’, हे तितकंच खरं आहे. ज्या तालासुरात लंके-पवार बोलत आहेत ते पाहता काहीतरी गडबड मात्र नक्की आहे.

विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नेते जर हतबल झाले असतील आणि सत्ता हाच त्यावर उतारा असेल तर दोन घटना घडू शकतात. शरद पवार यांचा गट अजित पवारांच्या गटात विलीन होऊन केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी होणार, नाहीतर शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटात विलीन न होता थेट सत्तेत सहभागी होणार. परंतु, या दोन्हीपैकी कोणतीही एक घटना घडणार असेल तर ती शरद पवार ‘निवृत्त’ झाल्याशिवाय घडणार नाही.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment