Rip News: माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे निधन - Rayat Samachar

Rip News: माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे निधन

रयत समाचार वृत्तसेवा

नगराध्यक्षपदाच्या काळातच श्रीरामपुरात ‘राम रहीम उत्सवा’ची सुरुवात

श्रीरामपूर | ४ डिसेंबर | सलीमखान पठाण

Rip News नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल शामराव कांबळे यांचे अहमदनगर येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. विशेष म्हणजे कालच त्यांचा वाढदिवस देखील होता. १९९१ – ९२ साली ते श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. धडाकेबाज निर्णय घेणारा नगराध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती होती. श्रीरामपूर पीपल्स बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष भूषविले होते. श्रीराम शारदोस्तव मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले होते. श्रीरामपूर सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे देखील ते अध्यक्ष होते.

Rip News त्यांचे वडील शामराव रतनशी कांबळे हे देखील श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. ८० ते ९० च्या दशकात युथ पावर ऑर्गनायझेशन या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शहरांमध्ये तरुणांचे मोठे संघटन उभे केले होते. माजी आमदार जयंत ससाणे व अनिल कांबळे या जोडीने श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला. एकमेकाचे जीवलग मित्र असलेले हे दोघे त्यानंतर पालिकेच्या राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकले. काही दिवसांपूर्वी कांबळे परत ससाणे गटात सामील झाले होते. त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक देखील अपक्ष म्हणून लढविली होती.

 त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळातच श्रीरामपुरात ‘राम रहीम उत्सवा’ची सुरुवात झाली. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी झालेल्या चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात. शहरामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
त्यांच्या मागे तीन भाऊ, एक मुलगा, पत्नीमाजी नगरसेविका भारतीताई कांबळे असा परिवार आहे. आज सकाळी येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. काल सकाळी सोशल मीडियावर त्यांचे वाढदिवसाचे शुभेच्छांचे मेसेज फिरत होते, दुपारी त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर लोकांचा सुरुवातीस त्यावर विश्वासच बसला नाही. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला नाही, हा एक दुर्दैवी योगायोग समजला जात आहे.
माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांच्या दुःखद निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Share This Article
Leave a comment