समाजसंवाद | १७ ऑक्टोबर | डॉ. श्रीमंत कोकाटे
Cultural Politics महाराष्ट्रातील असंख्य तरुणांची जडणघडण करण्यात अनेक संशोधक, विचारवंताप्रमाणे चित्रलेखाचे निवृत्त संपादक ज्ञानेश महाराव यांचा सिंहाचा वाटा आहे. मी स्वतः १९९९ सालापासून चित्रलेखाचा नियमित वाचक आहे. गेल्या तीस वर्षातील महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय घडामोडींमध्ये चित्रलेखाचा अर्थात ज्ञानेश महाराव यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चित्रलेखाने महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कार्य केलेले आहे. याचे श्रेय ज्ञानेश महाराव यांना जाते. अभ्यासूवृत्ती, निर्भीडपणा, प्रामाणिकपणा, ज्या त्या वेळेस योग्य भूमिका घेण्याची हिम्मत, भाषेतील सत्यनिष्ठा आणि प्रखरता हे त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत. महाराव म्हणजे करारी बाणा आणि लेखणीचा राणा आहेत. लेन प्रकरण २००३ साली घडले, कोंडदेव पुतळा प्रकरण २०१० साली घडले, पुरंदरे पुरस्कार प्रकरण २०१६ साली घडले, कोरेगाव भीमा प्रकरण २०१८ साली घडले, महाराव यांनी त्याच वेळेस भूमिका घेतली, समोर प्रकरणं घडत असताना ते शांतपणे बघत बसले नाहीत.
आज आपल्या देशामध्ये जे काही प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकार आहेत, त्यापैकी ज्ञानेश महाराव हे एक आहेत. अंधश्रद्धा, प्रतिगामीवृत्ती याविरुद्ध ते लेखणीचे शस्त्र करून अनेक वर्षापासून लढत आहेत. कदाचित त्यांना कल्पनाही नसेल इतके विद्यार्थी त्यांच्या मुक्त विद्यापीठातून तयार झालेले आहेत. आता ते जगभरातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले पण ते निराश झाले नाहीत, आणि विशेषतः आपल्यावर आलेल्या संकटाचे त्यांनी कधी खासगी आणि सार्वजनिक जीवनात भांडवलदेखील केले नाही.
ज्ञानेश महाराव हे जसे उत्तम पत्रकार आहेत तसेच ते उत्तम नाटककार आहेत, त्यांनी ‘जिंकू या दाही दिशा’, ‘घालीन लोटांगण’ आणि ‘संत तुकाराम’ (संगीत) ही तीन नाटके मराठी जनांना दिली. ‘जिंकू या दाही दिशा’ च्या माध्यमातून शिवराय ते फुले, शाहू, आंबेडकर ही विचारधारा जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. विनोदाबरोबर प्रबोधन त्यांनी केले. संत तुकाराम महाराजांची प्रेमळ, मायाळू तशीच क्रांतिकारक प्रतिमा संगीत नाटकातून त्यांनी मांडली. त्या नाटकात त्यांनी तुंबाजीची अफलातून भूमिका केलेली आहे. हजरजबाबीपणा हे त्यांच्या भूमिकेचे वैशिष्ट्य आहे. यातून त्यांनी बुवाबाजीवर कडाडून प्रहार केलेला आहे. ते जसे गंभीरपणे लिहितात, तसेच विनोदातूनदेखील प्रबोधन करतात.
ते उत्तम गायकदेखील आहेत. शास्त्रीय संगीतामध्ये ते पारंगत आहेत. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. तरीदेखील अतिव ध्येयवादातून आणि कर्तृत्वातून येणारा अहंकार त्यांच्याकडे नाही, महारावांना खोटारडेपणा अजिबात आवडत नाही. हे त्यांचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. महाराव हे योग्य वेळी अचूक भूमिका घेणारे पत्रकार आहेत. कोणाला काय वाटेल म्हणून सत्य लपवून असत्याची पाठराखण त्यांनी कधी केली नाही.
जेम्स लेन प्रकरणाच्या वेळेस अनेक विचारवंत, पत्रकार, लेखक, संशोधक मूग गिळून गप्प बसले होते. कांही पत्रकारांनी तर विकृत लोकांची बाजू घेतली होती. हा संवेदनशील विषय आहे, म्हणून खासगीत कुजबुज करून लेनवाद्यांपुढे गर्भगळीत झाले होते. अशा काळात “शिवरायांच्या बदनामीचे विदेशी पुस्तक, स्वदेशी मस्तक” अशा मथळ्याखाली लेख लिहून लेनवाद्यांना चव्हाट्यावर आणून शिवरायांचा सन्मान करण्याचे ऐतिहासिक काम महारावांनी केले. लेनवाद्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांची विषारी तोंड बंद केली. २००५ साली लेनवाद्यांच्या आश्रयदात्यांना दोन वेळा सत्तेपासून रोखण्याचे श्रेय ज्ञानेश महाराव यांना द्यावे लागेल. या घटनेने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि संशोधनाच्या क्षेत्रात दूरगामी परिणाम झाले. तरुणांमध्ये जाण, भान आणि ज्ञान आले, याचा पाया एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात महारावांनी घातला, असे म्हणावे लागेल.
२००५ साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. भाजप सेनेच्या आक्रमणापुढे त्यांनी माना टाकल्या होत्या. लेनप्रकरणी वाजपेयी-अडवाणी-ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र संतापला होता. ज्ञानेश महाराव यांनी त्या सर्वांची लेखनीतून आणि सभांमधून चिरफाड केली. त्यांची या विषयावरील बिंदू चौक (कोल्हापूर) येथील सभा विशेषतः खूप गाजली.
सुरुवातीला भांडारकरी लोकांच्या बाजूने उभे असणारे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे महाराव यांच्या सत्यवादी भूमिकेमुळे जागे झाले आणि ते महारावांची भूमिका मांडू लागले. त्यावेळेस महाराव यांनी आर. आर. पाटील यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांना विषय समजावून सांगितला, अनेक संदर्भ दिले. साहजिकच याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला २००५ च्या विधानसभा निवडणुकीत खूप झाला. जाणारी सत्ता महाराव यांच्या लेखणीमुळे त्यांना मिळाली. पण प्रामाणिक पुरोगामी संपादक असणाऱ्या महाराव यांची बाजू घ्यावी, त्यांना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर पाठवावे, असे आघाडीवाल्यांना वाटत नाही. कदाचित कामाच्या व्यापामुळे ते विसरले असतील.
लेनचे समर्थन करणाऱ्या कुमार केतकरांना काँग्रेसने खासदार केले. शिवरायांचा सन्मान करून राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला सत्तेपर्यत पोचविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महारावांना काँग्रेस-राष्ट्रवादीने काय दिले? जीवावर उदार होऊन पुरोगामी भूमिका बाजावणाऱ्या लेखक, पत्रकार, विचारवंत महाराव यांच्याप्रती काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका कृतघ्नपणाची आहे.
नवसरंजामदार सत्तेतील मराठा नेत्यांना सत्ता गेली की शिव, फुले, शाहू, आंबेडकर, पुरोगामी चळवळी आठवतात, आणि सत्ता आली की मुलगा, मुलगी, नातू, जावई, व्याही आठवतात. भाजपवाले त्यांच्या विकृत व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. उदाहरणार्थ पुरंदरे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले सुसंस्कृत विचारवंताच्यादेखील पाठीशी उभे राहत नाहीत. उदाहरणार्थ महाराव.
दादोजी कोंडदेव पुतळा हटवावा प्रकरण, राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण, बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरण, कोरेगाव भीमा दंगल प्रकरण इत्यादी विषय महारावांनी योग्य पद्धतीने मांडले, त्यामुळे आतापर्यंत महाराष्ट्र दंगलग्रस्त होण्यापासून वाचलेला आहे. महाराव सतत भूमिका घेत असतात.
पुरंदरे विरोधी “शिवसन्मान जागर परिषदां”वेळी ज्ञानेश महाराव, डॉ.जितेंद्र आव्हाड, प्रा.प्रतिमा परदेशी आणि सदर लेखाचे लेखक यांनी कोणत्याही स्वरूपाचे मानधन किंवा प्रवास खर्च न घेता, महाराष्ट्रभर सुमारे पन्नास शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या. ज्ञानेश महाराव यांनी तर त्यांना मुंबईत मिळालेल्या एका पुरस्काराची रक्कम कोल्हापूर येथील शिवसन्मान जागर परिषदेच्या संयोजकाकडे सुपूर्त केली. हजारो रुपये मानधन घेऊन संयोजकांना छळणारे वक्ते कमी नाहीत, पण स्वतः च्या खिशातील पैसे संयोजकांना देणारा वक्ता कधी आपण पाहिला आहे का?. त्या वक्त्याचे नाव आहे ज्ञानेश महाराव!
कोरेगाव भीमा प्रकरणाच्या माध्यमातून “मराठा विरुद्ध बौद्ध” अशी दंगल घडविण्याचा प्रतिगाम्यांचा डाव ज्ञानेश महाराव यांनी लेखमालेतून हाणून पाडला. त्यावेळेस खूप कठीण परिस्थिती होती. भूमिका घेण्यास अनेक लोक कचरत होते. पण महारावांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता वास्तववादी भूमिका मांडली. त्यामुळे महाराष्ट्रातील मोठा अनर्थ टळला. आजच्या काळात शब्द हेच शस्त्र आहे, हे ओळखून मराठी भाषेची आणि तुकोबा-ज्योतिबा यांच्या विचारांची इमानेइतबारे सेवा करणारे महाराव हे भाषाप्रभू आहेत.
ज्ञानेश महाराव हे केवळ पत्रकार नाहीत, तर ते उत्तम नाटककार आहेत. त्यांनी अनेक नाटकं लिहिली. त्या नाटकांचे शेकडो प्रयोग झाले. त्या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. संत तुकाराम महाराज नाटकातील तुंबाजीची भूमिका त्यांनी अफलातून केली. ते उत्तम शाहीरदेखील आहेत. ते उत्तम लेखक आहेत. समाजजागृती करणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ते उत्तम गायक आहेत. त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे. ते उत्तम वक्ते आहेत. त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरदेखील अनेक सभा गाजवलेल्या आहेत. दुबई येथे प्रतिवर्षी होणाऱ्या शिवजयंतीसाठी ते प्रमुख वक्ते होते.
ज्ञानेश महारावांच्या परखडपणामागे कोणाबद्दल असूया नाही, कोणाबद्दलही द्वेष नाही, आत एक बाहेर एक अशी त्यांची वृत्ती नाही, लॉबिंग करून कोणाला छळण्याची क्रूर मनोवृत्ती नाही, आपल्या वैचारिक विरोधकांशीही अत्यंत सहृदय अंतकरणाने सुसंवाद करणारे अत्यंत मानवतावादी पत्रकार, लेखक, नाटककार, संगीततज्ञ, प्रभावी वक्ते आणि कलाकार म्हणजे ज्ञानेश महाराव आहेत. त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे प्रबोधन केलेले आहे. धर्मात चिकित्सेला वाव असला तरच धर्म लोककल्याणकारी होतो, तरच धर्म वृद्धिंगत होतो.
महाराव यांच्या प्रबोधनामुळे हिंदू धर्माचे कल्याणच झालेले आहे, नुकसान झालेले नाही. महाराव हे हिंदू धर्माचे शत्रू नाहीत, तर ते धर्माचे सुधारणावादी आहेत.
वैचारिक मतभिन्नता असू शकते, ती कुटुंबातदेखील असते, समाजात तर असणारच, वैचारिक मतभिन्नतेचे भारतीय संविधानानेदेखील स्वागतच केलेले आहे. एखाद्या व्यक्तीचे वैचारिक मत मान्य नसेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचीदेखील एक शास्त्रशुद्ध पद्धती भारतीय लोकशाहीमध्ये आहे, परंतु आपले मत मान्य नसणाऱ्याच्या घरात किंवा कार्यालयात घुसून त्याच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे, दमदाटी करणे हे मात्र झुंडशाहीचे अर्थात हुकूमशाहीचे लक्षण आहे.
ज्ञानेश महाराव यांनी संपूर्ण आयुष्य संशोधन, लेखन, वाचन, प्रबोधन, पत्रकारिता, नाट्यलेखन, अभिनय, गायन यासाठी समर्पित केलेले आहे. त्यांनी कायम लोकशाही संविधानिक मूल्ये जपलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या कामाचा पूर्ण फायदा महाविकास आघाडीला झालेला आहे, परंतु परवा त्यांना एकट्याला गाठून धर्मांधांनी त्यांना दमदाटी केली, एकट्याला गाठून दमदाटी करण्यात शौर्य नसते, ज्ञानेश महाराव अशा दमदाटीला घाबरणारे नाहीत. ते निराश होऊन घरात बसणारेदेखील नाहीत, परंतु खंत याची वाटली की महारावामुळे ज्या राजकीय पक्षांना खूप मोठा फायदा झाला, ते मात्र त्यांच्या बाजूने पुढे आले नाहीत. विकृत, शिवद्रोही गिरीश कुबेरला संभाजी ब्रिगेडने काळे फासल्यावर निषेध करणाऱ्या एकानेही पुढे येऊन महाराव सरांना झालेल्या दमदाटीचा एका शब्दानेदेखील निषेध केला नाही! कृतघ्न कुठले!