अहिल्यानगर | १६ ऑक्टोबर | प्रतिनिधी
Election भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमवेत आयोजित बैठकीत सालीमठ बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणुकीच्या कालावधीमध्ये विविध राजकीय पक्षांकडून सभा तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येते. या सर्व सभा व बैठकांची माहिती प्रशासनास देऊन त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात. मतदारांना कुठल्याही प्रकारचे प्रलोभन दाखविले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विविध जाती, धर्म, भाषिक संप्रदायांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कुठलेही वक्तव्य करू नये. कुठल्याही धार्मिक स्थळाचा प्रचारासाठी वापर करू नये. समाजमाध्यमांवर पोस्ट टाकतेवेळी आवश्यक ती काळजी घ्यावी. निवडणूकीच्या काळात काय करावे व काय करु नये, याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक ओला म्हणाले, निवडणुकीच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ही निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीस विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.