अहमदनगर | प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन महावीर भवन, हिंगोली येथे नुकतेच संपन्न झाले. या प्रसंगी राज्य सरचिटणीसपदी कल्याण लवांडे (ता.पाथर्डी ), राज्य संयुक्तचिटणीसपदी राजेंद्र निमसे (अहमदनगर) तर राज्यसंघटकपदी बाळासाहेब कदम (अहमदनगर) यांची निवड करण्यात आली.
शिक्षकनेते स्व.अरुणभाई दोंदे व प्राथ शिक्षकांचे श्रद्धास्थान स्व.सुलभाताई दोंदे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम यावेळी साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नूतन राज्याध्यक्ष देविदास बस्वदे होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधून शंभर प्रतिनिधीमागे एक असे शेकडो प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंबंधी चर्चा होऊन त्यामध्ये जूनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे, सरसकट निवड श्रेणी मिळणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, प्राथमिक शिक्षकांची बीएलओ च्या कामातून मुक्तता करणे, राज्यातील शालेय कामाच्या दिवसांमधील असमानता दूर करणे, शालेय स्तरावरील समित्यांचे समावेशीकरण तसेच एमएससीआयटी ची अट रद्द करणे अशा विविध मुद्यांबाबत चर्चा झाली.
लवकरच हे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यसंघाचे सर्व नूतन पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले .
तसेच ११ ऑक्टोबर आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक प्रश्नी आयोजित मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या उच्चपदी निवड झाल्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर व ऐक्य मंडळ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष प्रदिप चक्रनारायण यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संघाचे राज्य सल्लागार प्रकाश दळवी, सुरेश भावसार, विश्वनाथ सूर्यवंशी, अहमदनगर जिल्हासरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कोषाध्यक्ष विलास लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कराड, ऐक्य मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर रणदिवे, श्रीगोंदा संघाचे तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड यांच्यासह बहुसंख्य प्राथमिक शिक्षक उपस्थित होते.