श्रीगोंदा | ५ ऑक्टोबर | अशोक होनराव
movement श्रीगोंदा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांनी ता. १ ऑक्टोबरपासून विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले, कामबंद आंदोलन पुकारले. वंचित घटकातील या उपोषणार्थीना रिपब्लिक पार्टीने पाठिंबा दिला आहे.
दोन दिवसांपासून कंत्राटी आरोग्य कामगारांच्या संपामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. वातावरणातील बदल, हवा वायु प्रदुषण व घाणीचे साम्राज्य यामुळे पालिका प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे, असे जनता खुलेआम बोलत आहे.
उपोषणार्थी सफाई कामगार यांच्याकडे उपोषणाच्या पहिल्या दिवशी पालिकेने ढुंकुनही पाहिले नाही तर दुसऱ्या दिवशी कार्यालय प्रमुख ढवळे व आरोग्य विभाग प्रमुख पडोलकर यांनी भेट घेवून मागण्यांचे निवेदन स्विकारले. पालिका मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांना मात्र कष्टकऱ्यांना भेटण्यासाठी अद्याप वेळ मिळाला नाही.
उपोषणासंदर्भात पिनु ससाणे या कामगाराने सांगितले, आम्ही प्रामाणिकपणे आरोग्यसेवेचे काम करतो. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आम्हास पगार नाहीत, त्यामुळे काम करून आमच्यावर उपासमारीची वेळ आली. यापूर्वीच्या आंदोलनावेळी जुलै २०२४ मध्ये मुख्याधिकारी यांनी आश्वासन देवून कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे आमचे पगार थकले.
ऐन सणासुदीच्या काळात संप करणे आम्हास पटत नव्हते परंतु काम करूनही उपासमार हा अन्याय आम्ही कसा सहन करावा? शेवटी आम्ही आमच्या मागण्यांसाठी कामबंद करून पालिकेसमोर उपोषणास बसलो आहोत, असे उपोषणार्थीनी सांगितले.
भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) चा तपशील आम्हांस मिळावा. गेल्या तीन महिन्यांचा पगार मिळाव. किमान वेतन कायद्यानुसार आम्हास रोजंदारी मिळावी. प्रत्येक महिन्याचे पगार वेळेवर व्हावेत. आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षा साहित्य मिळावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.
श्रीगोंदा नगरपरिषदेने आरोग्य कामाचा ठेका पुणे येथील रत्नप्रभा फॅसिलिटी सर्व्हिसेस यांना दिला परंतु ठेकेदार कंपनीची बिले पालिकेकडून मिळत नसल्याने, थकित असल्याने ठेकेदार कंपनी कामगारांना पगार करू शकत नाही, इसे सांगण्यात येते.
मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी तातडीने प्रश्न सोडवावा व वंचित समाजावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना शिन्दे गट तालुका प्रमुख मिरा शिंदे यांनी केली. आंदोलनास टिळक भोस, मनोहर पोटे, अनिल ठवाळ, राजीवदादा गोरे, नंदकुमार ससाणे आदी आजी माजी पदाधिकारी यांनी भेट देवून पाठिंबा दर्शविला.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा