समाजसंवाद|१४ सप्टेंबर|सॉलोमन गायकवाड
Hindi News भारत देश एकूण जगासाठी औत्सुक्याचा देश आहे. अनेक जाती, धर्म, भाषा यांचा एकत्रित समूह म्हणजे अखंड भारत देश. प्रत्येक ज्ञाती आपलं वैशिष्ट्य राखून आहे. प्रत्येकाला एक दुसर्याबद्दल आदर आहे. संवादाचं मुख्य माध्यम भाषा असते. संवादाशिवाय सामाजिक गतीला अवरोध होतो. सुसंगत जीवन हे प्रत्येकाचे लक्ष्य असतं. त्याचाच एक मुख्य भाग म्हणून या देशाने भाषावार प्रांतरचना अनुसरली. प्रत्येक प्रांताची आपली एक मातृभाषा आहे. या मातृभाषेवर प्रांतिक जनतेचे अतोनात प्रेम आहे. तेथील प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान आहे. भाषा संरक्षण आणि भाषा संवर्धन या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रातांतील लोक आग्रही आहेत. ते निखालस योग्य देखील आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यात देशात मुक्तसंचार हे देखील स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना, एका प्रांतातील नागरिकाला दुसर्या प्रांतात गेल्यावर संवादासाठी त्रयस्थ भाषेचा आधार घ्यावा लागतो, इथपर्यंत ठीक आहे. परंतू अलिकडच्या काही वर्षांत एक अडचण लक्षणीयरित्या नजरेस येत आहे. बहुत प्रांत असे आहेत की, आमच्या राज्यात किंबहुना प्रांतात आल्यावर आमच्याच प्रादेशिक भाषांमध्ये संवाद व व्यवहार केला पाहिजे. हा आग्रह प्रकर्षाने जाणवू लागला. यातून कधीकधी जटील समस्या देखील निर्माण होते. म्हणूनच प्रांतवार भाषा कीतीही भिन्न असू द्या, मात्र एका प्रांतिक नागरिकाला दुसऱ्या प्रांताशी संवाद करायला एक देशव्यापी एक समान भाषा ही गरज जाणवते आहे. तसं पाहिलं तर अनेक भाषा आपला शतकीच नव्हे तर हजारो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या आहेत. त्या त्या भाषांमधील साहित्य आणि पुरावे प्रत्येकाकडे आहेत. परंतू त्यात सर्वसमावेशकपणाच्या पार्श्वभूमीवर मतभिन्नता आहे.
आजमितीला एकवाक्यता होऊ शकेल अशी हिंदी ही भाषा आहे. यालाही अनेकांचा आक्षेप असू शकतो. परंतू संवाद व व्यवहाराच्या दृष्टीने सहज साध्य आणि किमान परिचित अशी हिंदी भाषा आहे, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी यासाठी ब्रिटीश काळापासून अनेकांनी प्रयत्न केले आणि आजही करीत आहेत. पंडिता रमाबाई हे त्यातील एक नाव आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी यासाठी इंग्रज सत्तेकडे त्यांनी नेटाने आग्रह धरला, त्याचा पाठपुरावा केला. दुसरे महत्वाचे नाव आहे (कै.) आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे. यांचा जन्म १८६७ चा. आयुर्वेद महोपाध्याय ही पदवी मिळविलेला पहिला माणूस. साहित्य, न्याय, व्याकरण, मिमांसा हे त्यांचे हक्काचे क्षेत्र. गुजराती, मराठी भाषेत मासिक सुरु केल्यावर सद्वैद्य कौस्तुभ या नावाचे हिंदी मासिक त्यांनी सुरु केले. हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी आणि नागरी लिपी समान व्हावी यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. आज हिंदी भाषा मान्यता कोणत्या अवस्थेत आहे हे सर्वश्रुत आहे. त्यावेळी त्यांना कितीसा प्रतिसाद मिळाला असेल याची कल्पना करता येईल. नुकसान सोसून त्यांचे प्रयत्न चालू होते. मृत्यूवेळी त्यांचे अखेरचे बोल होते “मी हिंदुस्थानची भाषा एक करण्याचा प्रयत्न केला. माझे ते स्वप्न अपुरे राहिले. तुम्ही ते पुर्ण करा” या महान प्रभुतींप्रमाणेच अनेकांनी हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि आजही करीत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी शासनानेही या विषयास गती देण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ती गती प्राप्त झाली का? याचे उत्तर अस्पष्ट आहे.
वस्तुतः हिंदी भाषा ही अन्य भाषेच्या मानाने आम्हाला खूप जवळची आणि परिचित आहे. हिंदी भाषेचे काही भाषांशी साधर्म्य दिसते खरे पण ती एक स्वतंत्र भाषा आहे. या भाषेशी कोणी धर्माशी सांगड घालण्याचाही प्रयत्न करतात. पण तसे नाही करता येत. जगात ज्या भाषा बोलल्या जातात त्यात हिंदी ही क्रमांक दोनची भाषा आहे. म्हणजे देशांतर्गत संवाद भाषा म्हणून एकवाक्यता यासोबतच राष्ट्रराष्ट्रांतर्गत बोलण्यासाठीही ती प्रभावी आहे. म्हणूनच या देशाचे पंतप्रधान आणि संबंधित मंत्री जेव्हा परदेशात जातात तेव्हा हिंदीमधून संवाद किंवा भाष्य करु शकतात. आमच्याकडे प्राणी, पक्षी, फूल, वनस्पती, झेंडा, चिन्ह असं पुष्कळ काही राष्ट्रीय म्हणून घोषित आहे. भाषा म्हणून काय? याचा विचार गरजेचा आहे. आज चौदा सप्टेंबर, हिंदी भाषा दिवस. खरंतर तो राष्ट्रीय पातळीवर साजरा झाला तर तो पाहिजे आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा