अहमदनगर | १३ सप्टेंबर | प्रतिनिधी
अहमदनगरसह राज्यभर २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेच्या Bank Fraud घोटाळ्यामुळे गाजत असलेल्या नगर अर्बन बँक घोटाळ्यासंदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बँकेचा मोठा थकबाकीदार कर्जदार अमित पंडीत याने उच्च न्यायालयात कबूल केलेली रक्कम रूपये १० कोटी ६४ लाख निर्धारित मुदतीत परत करण्याची अट पुर्ण केल्यामुळे त्यास नियमित जामीन मंजूर झाला. हा निर्णय न्यायाधीश मेहरे साहेब यांनी दिला.
याविषयी अधिक माहिती देताना बँक बचाव समितीचे शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सांगितले की, न्यायालयाने सध्या जेवढी रक्कम भरायला सांगितली तेवढी त्याने भरली आहे. त्यामुळे यात आपण कोणी हस्तक्षेप केला नाही.
जे कर्जदार पैसे परत करत असतील त्याबाबत आपण हस्तक्षेप करत नाही, परंतु जे पैसे भरत नाहीत त्यांना जामीन देण्यास आपला विरोध राहील. कारण हे पैसे ठेवीदारांचे आहेत.
ते पुढे म्हणाले, जिल्हा व सत्र न्यायालयाचे माननिय न्यायाधीश पी. आर. सित्रे साहेबांनी अशीच योग्य भूमिका घेतली आहे. काही कर्जदारांनी पैसे परत करून जामीन घेतला आहे. या कर्जदारांनी बँकेचे संचालक व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी केलेल्या संगनमत कट कारस्थानाबद्दल अंतिम निर्णय होण्यास आणखी मोठा कालावधी लागणार आहे. बाकी अमित पंडीतचे उर्वरित रक्कमेविषयी योग्य वेळी योग्य निर्णय होईल, सध्या त्यावर जास्त न बोलणे योग्य.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा