साहित्यवार्ता | १० सप्टेंबर | टी.एन.परदेशी
Religion ‘महाभारत : एक सूडाचा प्रवास’ हे दाजी पणशीकर यांचे एका महत्वाच्या विषयावरील पुस्तक. महाभारतातील अनेक महत्वाच्या घटनांच्या मुळाशी सूडभावना असून हे महाकाव्य म्हणजे अनेक लहानमोठ्या सूडकथांची गुंफण असल्याची मांडणी दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात कौशल्याने केली आहे. सूड व शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
समोरच्या माणसाने केलेल्या चुकीचा न्यायनिवाडा एखादी व्यक्ती स्वतःच्या मर्जीने करून सूड उगवते. शाप हा सूडाचाच प्रकार आहे. शाप बलवान व्यक्ती देते तशीच एखादी दुर्बल व्यक्तीही देते.
आपली महाकाव्ये व पुराणे अशा अनेक रंजक शापकथांनी भरलेली आहेत.
रामायणातील श्रावणबाळाच्या बापाने राजा दशरथास दिलेल्या शापाचा रामायण घटीत होण्यात मोठा वाटा आहे. या शापातील श्रावणाचा बापही राजा दशरथासारख्या बलदंडासमोर एक नगण्य व्यक्ती असूनही नगण्यताच त्याच्या असहाय्यतेस कारणीभूत होते. या असहाय्यतून येतो तळतळाट व त्यातून उद्गारली जाते शापवाणी ! बलदंड माणसाकडून झालेल्या छळाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य क्षुद्र जीवांच्या अंगी नसते हे व्यवहारात आपण नेहमी पाहतो.
महाभारतातील रणधुरंधर, अजेय भीष्माचार्यांच्या अंतास कारणीभूत झालेल्या शिखंडीच्या कथेच्या मूळाशी काशीराजाच्या अंबा नावाच्या असहाय्य व अन्यायग्रस्त कन्येचा तळतळाटच कारणीभूत आहे. सर्व बाजूंनी नाकारल्या गेलेल्या अंबेच्या जीवाचा तळतळाट अखेरीस तिला अग्नीप्रवेशाकडे घेऊन जातो व पुढील जन्मात ती शिखंडी होऊन भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत होते.
मयसभेतील दुर्योधन चकतो, त्याची फजिती पाहून द्रौपदी हसते. तो थोरला दीर याचे भान तिला राहत नाही. या अपमानाचा बदला म्हणून पुढे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग व त्यातून महाभारत युद्धाचा भयानक संहार घडतो. येथे कोणी दुबळा नाही, द्रौपदी व दुर्योधन दोघेही सारखेच बलवान असून केवळ अपमान व अस्मितेच्या कारणातून घोर प्रसंग घडतात.
पुराणकाळातील ऋषींनी वेळोवेळी शाप दिले आहेत, सर्वच ऋषी शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध आहेत ! इंद्र शाप देतो तशाच देवताही शाप देतात. या इंद्र – देवतांच्या शापकथांमधे
उ:शापही आहेत.
पुराणकथांमधील या सर्व शाप कथांचा सारांश काढला तर यातील क्रिया व प्रतिक्रीया यामागे अनेकदा पदाचा, बलाचा, सत्ता – संपत्तीचा माज व बेभान वृत्ती तसेच अहंकार, दुराभिमान मत्सर व कृतघ्नता अशा मानवी दुष्प्रवृत्तीही कारणीभूत असल्याचे दिसते.
मानवी जीवनात हे सूड, तळतळाटाचे चक्र पूर्वापार आजपर्यंत अव्याहतपणे चालू असल्याचे दिसते.
विज्ञानाने माणसाची भौतिक प्रगती झाली पण त्याच्या मूळ वृत्तींमधे काही फरक पडलेला नाही, उलट त्या अधिकाधिक उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.
एखाद्या शत्रुस इच्छित स्थळी कटकारस्थान करून बोलावले जाते व एक अठरावीस वर्षांचा मुलगा त्या व्यक्तीवर कोयत्याने वार करतो, शत्रू निपचित पडलेला असूनही बेभानपणे त्यावर वीस पंचवीस वार केले जातात. हे सारे आसपासच्या सी.सी.टी.व्ही.कॅमेर्यात चित्रित होत. रस्त्यावरील लोक मोबाईलमधे हे क्रौर्य निर्विकारपणे रेकाॅर्ड करतात. अशा भयानक घटना नित्याच्या झाल्या आहेत.
मुलगा भररस्त्यात जन्मदात्या बापावर भरधाव वेगातील कार घालतो, सख्खी बहीण भावाला जीवे मारण्याची सुपारी देते, प्रियकराच्या मदतीने पती व मुलगा यांची हत्या एखादी मदांध महिला करते. अशा विपरित घटना पाहून व ऐकून आपली मने निर्ढावली आहेत.
“नाथभक्ताशी वाकडं त्याची म्हसणात लाकडं ” अशी एक म्हण ग्रामीण भागात आहे. मागील आठवड्यात एका गृहस्थांनी तिच्याविषयी माझे मत जाणून घेण्यासाठी फोनवरून विचारणा केली. यावर मी त्यास त्याचे याविषयीचे अनुभव विचारले, त्यानेही दोन तीन कथा सांगितल्या. यामधे खरे खोटे करण्यात काही अर्थ नसतो.
शाप व सूड या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी शाप म्हणजे मिथक तर सूड हे वास्तव आहे !
उपर्युक्त नाथभक्ताविषयीची म्हण म्हणजे नेमके काय मग ? वास्तव, मिथक की अंधश्रद्धा ? मूळात अशी म्हण निर्माण होण्यामागचा कार्यकारण भाव काय असावा ?
कोणीएक बलदंड असा मसल व मनी पाॅवर असलेला धनदांडगा एखाद्या गरीब माणसाचा कपटनीतीने छळ करून सूडबुद्धीने वागून त्याचे जगणे अशक्य करत असल्याची घटना वास्तवात घडताना आपल्या आसपास नेहमी दिसून येते. गरीबांच्या मुलीबाळींना अनैतिक हेतूने त्रास दिला जातो. हातावरचे पोट असणाऱ्या परंतु मोक्याच्या जागेवर दोन तीन गुंठे जागेतील वडिलोपार्जित घरदार असणाऱ्या माणसास ती जागा अत्यल्प भावात सोडून देण्यासाठी एखादा बाहुबली दमदाटी करत असतो.
तेव्हाच्या असहाय्यतेतून अशी शापवाणी त्या गोरगरीब माणसाकडून उच्चारली जात असावी. देव पाहून घेईल, सद्गुरू पाहून घेतील ही विधाने ही अशीच असहाय्यतेतून आलेली असतात!
दीनदुबळी माणसं नेहमीच, सर्व युगांमधे असा असह्य जाच व छळ सहन करत आली असून अशीच असहाय्य होऊन जगत आली आहेत, त्यांच्याहाती शापवाणी उच्चारण्याशिवाय दुसरे काही नसते. आपल्या आराध्य – ईष्ट दैवताचे नाव घेऊन शापवाणीस उदात्ततेचे अधिष्ठान प्राप्त करून देण्याची धडपडही त्याच असहाय्यतेतून आलेली असते !
“कोणाचा तळतळाट घेऊ नका” असे मागील पीढीतील जुनी जाणती – म्हातारी कोतारी माणसं तरूण पीढीला आवर्जून सांगत असत.
हल्लीच्या ‘ज्येष्ठ’ नागरिकांच्या अंगी मुलांना असे सांगण्याचे धैर्य राहिलेले नाही.
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा