पर्यटनवार्ता | ८ सप्टेंबर | कामिल पारखे
Religion पॅरीसहून आम्ही रेल्वेने लुईसच्या दिशेने निघालो. ग्रामीण फ्रान्सचे या प्रवासातून ओझरते दर्शन घडले. आपल्याकडे असते तशी घनदाट वस्तीची गावे व शहरे या प्रवासात अजिबात दिसली नाही. लुईस रेल्वेस्टेशनवर उतरलो तेव्हा फ्रान्समधल्या वाटेरवरच्या इतर रेल्वे स्टेशनांपेक्षा मोठ्या संख्येने येथे लोक उतरले होते. कारण स्पष्टच होते, लुईस हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक महत्त्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र होते.
युरोपच्या दौऱ्यावर जॅकलिन आणि बारावीची परीक्षा दिलेल्या आमची मुलगी अदितीसह मी आलो होतो. सहा महिन्यांपूर्वी नियोजन केलेल्या तीन आठवड्याच्या या सहलीत इंग्लंड, फ्रान्स आणि इटलीचा दौरा करण्याचे ठरले होते. मात्र इंग्लंडचा व्हिसा वेळेत मिळला नाही, त्यामुळे अखेरीस विमानप्रवासाच्या काही तास आधी फ्रान्सकडून उर्वरीत युरोपदौऱ्यासाठी शेंगेन व्हिसा मिळवून आम्ही पॅरीसला आलो होतो. आधी ठरल्यापेक्षा आता लुईसमध्ये अधिक काळ म्हणजे तीन दिवस राहणार होतो. मेरियन डिव्होशनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या य शहराची ओळख करुन घेण्यासाठी आमच्याकडे मुबलक वेळ होता.
लुईस हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे राहण्याची व्यवस्था असणाऱ्या, खाण्यापिण्याची सोय असणाऱ्या हॉटेलांची संख्या भरपूर आहे. युरोपच्या या दौऱ्याचे नियोजन करताना काही आठवडे आधीच आम्ही इथले एक हॉटेलमधली एक रुम आरक्षित करुन ठेवली होती. रेल्वे स्टेशनवर उतरुन टॅक्सीने आम्ही आधीच आरक्षण केलेल्या हॉटेलकडे आलो. आम्ही हॉटेलात पोहोचलो तेव्हा हॉटेलमधल्या इतरही अनेक रुम्स आधीच आरक्षित केल्या होत्या, असे कळाले. हॉटेलची रुम पॅरीसच्या हॉटेलच्या मानाने आधीच ऐसपैस आणि स्वस्त होती. अजून संध्याकाळ झाली नव्हती, फ्रेश होऊन भटकंतीला बाहेर पडलो. मेरीयन डिव्होशन म्हणजे मदर मेरीच्या भक्तीसाठी जगात काही प्रसिद्ध तिर्थक्षेत्रे आहेत, त्यापैकी हे एक महत्त्वाचे जागतिक स्थळ. इथल्या मदर मेरीला ‘अवर लेडी ऑफ लुईस’ या नावाने संबोधले जाते. प्रत्येक
तीर्थक्षेत्रातील मदर मेरीला त्या शहराच्या नावाने ओळखले जाते. पोर्तुगालमधले फातिमा शहर हे मेरीयन डिव्होशनसाठी युरोपमधले दुसरे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. तिथली मारियामाता ‘अवर लेडी ऑफ फातिमा’ या नावाने ओळखली जाते. तामिळनाडूमधले वेलंकणी शहर हे आपल्या भारतातले सर्वांत मोठे मारीयामातेचे तीर्थक्षेत्र आहे. इथली साडीमधली मदर मेरी ‘अवर लेडी ऑफ वेलंकणी’ या नावाने प्रसिद्ध आहे.
मुंबईतील बांद्रा येथील ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माऊंट’ देशपातळीवर प्रसिद्ध आहे. कॅथोलिक चर्चने अधिकृतरीत्या श्राईन म्हणजे तीर्थक्षेत्रांचा दिलेल्या अनेक स्थळांमध्ये भारतातील वेलंकणी आणि बांद्रा येथील धर्मस्थळांचा समावेश होतो.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथल्या मतमाऊलीच्या सप्टेंबर महिन्यातील यात्रेला चारपाच लाखांची गर्दी होत असली तरी या गावाला अजूनतरी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला नाही. मतमाऊली या नावाला चर्चमध्ये अजूनही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. इथल्या मारीयामाऊलीला जागतिक पातळीच्या कॅथोलिक चर्चमध्ये ‘मतमाऊली ऑफ हरेगाव’ वा ‘अवर लेडी ऑफ हरेगाव’ असे ओळखले गेले तर माझ्यासारख्या असंख्य मराठी ख्रिस्तीजनांना आनंदच वाटेल.
कॅथोलिक चर्चमध्ये एखाद्या व्यक्तीला संतपदाचा दर्जा देण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, गुंतागुंतींची आणि वेळखाऊ असते, तसेच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याबाबत आहे.
भारतीय संस्कृतीत विविध राज्यांत आणि प्रदेशांत एकाच देवीचे विविध नावे, अवतार आणि रुपे आढळतात, तसेच येशू ख्रिस्ताची आई असलेल्या मारियामातेची अनेक नावे किंवा विशेषणे आणि रुपेही आहेत. उदाहरणार्थ, लुईस येथील मदर मेरीची प्रतिमा ही फातिमा किंवा वेलंकणी या तीर्थक्षेत्रांतील मदर मेरीच्या प्रतिमेतून अगदी वेगळी आहे. अर्थात येशू ख्रिस्ताच्या प्रतिमांत आणि पुतळ्यांतही हे वेगवेगळेपण असतेच. उदाहरणार्थ, ब्राझिल येथील तो सुप्रसिद्ध खाईस्ट दि रिडीमरचा भव्य पुतळा, प्राग येथील चाईल्ड जिझस (प्रागचा बाळ येश) किंवा ख्राईस्ट द किंग, वगैरे.
मदर मेरीच्या जन्मदिनाच्या सणानिमित्त किंवा फेस्टनिमित्त आठ सप्टेंबरला जगभरातील सर्व मेरियन डिव्होशन सेंटरमधे मोठा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त नऊ-दहा दिवसांपूर्वीच दररोज केल्या जाणाऱ्या ऑनलाईन नॉव्हेना प्रार्थना आता सुरुही झाल्या आहेत. पुण्यात खडकी येथे आठ सप्टेंबरपूर्वी दहा दिवस आधी वेलंकणी मातेची मोठी यात्रा भरते, मुंबईत बांद्रा येथील बॅसिलिकात मात्र आठ सप्टेंबरनंतर माऊंट मेरीची मोठी यात्रा भरते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर सगळीकडेच बंधने आली आहेत.
लुईस या गावी बेर्नादेत या मुलीला एका टेकडीवर मदर मेरीने १८५८ साली अनेक वेळा दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. बेर्नादेत या मुलीला मदर मेरी दर्शन देते, असे ऐकल्यावर अनेक लोक हा चमत्कार पाहण्यासाठी तिथे जमत असत. मात्र बेर्नादेतशिवाय इतर कुणालाही मारियामातेचे दर्शन घडले नाही. सुरुवातीला कॅथॉलिक चर्चने मारियामातेच्या दर्शनाच्या बेर्नादेतच्या या दाव्याकडे दुर्लक्ष केले. मध्ययुगीन इन्क्विझिशनच्या काळात असा दैवी दर्शनाचा कोणी दावा केला असता तर त्या व्यक्तीला कॅथोलिक चर्चच्या इन्क्विझिशन मंडळातर्फे पाखंडी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली असती.
कॅथोलिक चर्चने मात्र नंतर बेर्नादेत या मुलीला दर्शन देणारी ती तरुण महिला म्हणजेच निष्कलंक गर्भसंभव असलेली ‘इम्पॅक्युलेट कन्सेप्शन मदर मेरी’ यावर शिक्कामोर्तब केले. या दर्शनानंतर लवकरच बेर्नादेत जवळच्याच एका कॉन्व्हेंटमध्ये नन म्हणून दाखल झाली, वयाच्या पस्तिसाव्या वर्षी १८७९ साली क्षयाने तिचे निधन झाले. कॅथोलिक चर्चने १९३३ साली बेर्नादेतला संत म्हणून जाहीर केले.
मारियामातेची दर्शने किंवा ‘ऍपॅरिशन्स ऑफ मदर मेरी’ या घटनेमुळे लुईस हे शहर जगातील आणि युरोपातील काही मोजक्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये गणले जाते. अशा या लुईस शहराच्या रेल्वे स्टेशनवर आम्ही तिघे उतरलो आणि लगेचच या शहराच्या ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक आणि पर्यटन वैशिष्ठ्यांची ओळख व्हायला लागली.
लुईसचे मुख्य मंदिर भव्य आहे, त्यासमोर मोठे मैदान आहे. येथे आल्यावर कुणालाही त्या चर्चच्या समोर आपला फोटो घेण्याचा मोह होतोच. युरोपात असे अनेक ठिकाणी होत असते. संध्याकाळ होत चालली तसे त्या तिर्थक्षेत्रातली गर्दी वाढू लागली. त्या संध्याछायेत अनेक लोक मेणबत्या घेऊन आले होते. अंधार होत गेला तसे या मेणबत्त्या पेटवल्या गेल्या. काही लोकांच्या हातात मदर मेरीच्या फोटोंचे बॅनर होते, काहींच्या हातात त्यांच्या देशांचे राष्ट्रध्वज होते. वेगवेगळ्या राष्ट्रांतले, विविध वंशांचे भाविक तेथे जमा झाले होते, हे त्या गर्दीकडे एक नजर टाकली म्हणजे सहज लक्षात येत होते. आमच्यासारखे अनेक आशियाई लोकही तेथे होते, त्यापैकी काही भारतीय आणि अगदी मराठी माणसे असण्याचीही शक्यता होती.
थोड्याच वेळात फ्रेंच, लॅटिन, इंग्रजी आणि इतर भाषांत रोझरीची प्रार्थना सुरु झाली. भाषा कुठलीही असली तरी आता कुठली प्रार्थना चालू आहे याचा सरावाने प्रत्येक भाविकाला अंदाज येत होता, आणि त्यानुसार त्या व्यक्ती आपापल्या भाषांत प्रतिसाद देत त्या प्रार्थनांत सर्वजण सहभागी होत होते. उदाहरणार्थ, ‘आवे मारिया’ ही प्रार्थना सुरु झाली कि इंग्रजीत ही ‘हेल मेरी’ आणि मराठीत ‘नमो मारीया’ ही प्रार्थना आहे हे चटकन कळतेच. अंधार वाढत गेला तसतसे मेणबत्त्या घेऊन प्रार्थना म्हणत चाललेल्या त्या गर्दीला एक वेगळाच भारदस्तपणा आला होता. मिरवणुकीच्या केंद्रस्थानी मदर मेरीचा मोठा पुतळा होता. अर्ध्या तासांनी ही मिरवणूक संपली आणि तिथे आलेले लोक हळूहळू पांगू लागले, आपापल्या हॉटेलांकडे जाऊ लागले. येथे जमलेले बहुसंख्य लोक आमच्यासारखेच पाहुणे होते, स्थानिक लोक अगदी मोजकेच होते हे माझ्या लक्षात आले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या ठराविक ठिकाणी मदर मेरी बेनार्देतला दर्शन द्यायची त्या ठिकाणी मिस्साविधी होता. एकदोन कार्डिनल, काही बिशप्स आणि अनेक धर्मगुरु या प्रार्थनेला हजर होते. कार्डिनल, बिशप आणि धर्मगुरु यांचा विशिष्ट झगा असतो, त्यामुळे त्यांचे पद चटकन लक्षात येते. उदाहरणार्थ, कॅथॉलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजे पोप यांचा संपूर्ण झगा आणि इतर पोशाख सफेद असतो, तर त्यांच्या खालोखाल पद असणाऱ्या कार्डिनलांचा पोशाख लालसर रंगाचा असतो, डोक्यावर विशिष्ट आकाराची कार्डिनल पदाची ‘रेड हॅट’ असते तर बिशपांची स्कल कॅप छोटीशी गोल आकाराची असते.
मिस्साविधी संपला आणि मग व्हील चेअरवर असणाऱ्या आजारी लोकांना तिथल्या कार्डिनल आणि बिशपांकडे आशीर्वादासाठी नेण्यासाठी रांग लागली. प्रत्येक रुग्णासाठी ते कार्डिनल किंवा बिशप एकदोन वाक्यांची प्रार्थना म्हणत आणि रुग्णाच्या कपाळावर कुसाची खूण करुन ते दुसऱ्या रुग्णाकडे वळायचे. यापैकी बहुतेक रुग्ण हे विविध वयोगटांतील मतिविकलांग होते.
विशेष म्हणजे या सर्व रुग्णांना त्या व्हिलचेअरवरुन त्या तीर्थक्षेत्री फिरवणाऱ्या महिलांचा एक खास पोशाख होता, पूर्वी नर्सेस डोक्यावर हॅबिट घालायच्या तशा हॅबिट त्यांच्या डोक्यावर होत्या आणि त्यात सर्वांचा निळ्या रंगाचा पोशाख होता. नंतर मला कळाले कि, या महिला पॅरामेडिकल दलाच्या होत्या, या रुग्णांना अशाप्रकारे नेण्याची खास सेवा स्थानिक लोक पुरवत होते आणि त्यासाठी पाहुण्या भाविकांकडून शुल्क आकारले जात होते. अशाप्रकारे स्थानिक लोकांना एक रोजगार मिळाला होता.
बेर्नादेतला ज्या ठिकाणावरुन पवित्र मारियेचे दर्शन घडले ती जागा आता जगातले एक महत्त्वाचे मॅरीयन भक्तीचे तीर्थक्षेत्र बनले आहे. त्या डोंगरावर खडकाच्या एका कोरलेल्या जागेत शुभ्र आणि निळ्या पट्ट्याचे वस्त्र घातलेल्या मदर मेरीचा मोठा पुतळा आहे. या पुतळ्याला लागून खाली शेजारी मिस्साविधीसाठी आल्तार म्हणजे वेदी बनवली आहे.
मिस्सा संपल्यावर भेटीवर आलेले भाविक या पुतळ्याशेजारी उभे राहून स्वतःचे फोटो काढतात. मीसुद्धा जॅकलिन आणि आमची मुलगी अदिती यांच्याबरोबर फोटो काढले. या डोंगरातून सतत वाहणाऱ्या पाण्याचे एक स्रोत आहे. आपल्याकडे अनेक तीर्थक्षेत्री सतत वाहते पाणी असलेल्या गोमुखासारखाच हा प्रकार होता. अनेक भाविक हे पवित्र पाणी पित होते, काही जण आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी बाटल्यांत हे पाणी भरत होते.
या गावातले बेर्नादेतचे घर आता या तिर्थक्षेत्रातील एक महत्त्वाचे स्थळ बनले आहे. जुन्या, मागच्या शतकातील हे घर आजही जपवून ठेवले आहे. आसपास छान लँडस्केप आहे.
लुईस येथील आणखी एक महत्त्वाचे स्थळ म्हणजे भुयारात असलेले येथील एक प्रशस्त चर्च. येथे एका वेळेस पाचसहा हजार भाविक मिस्साविधीला हजर राहू शकतात, ठिकठिकाणी लावलेल्या पडद्यांवर आल्तारावर म्हणजे वेदीवर काय चालू आहे हे दिसत असते. आम्ही गेलो त्यादिवशी पाचसहा कार्डिनल्स अनेक बिशप्स आणि धर्मगुरुंसह मिस्सा साजरा करत होते.
या डोंगराजवळून एक नदी वाहत असते, ते निळेगार रंगाचे, स्वच्छ पाणी पाहून खूप बरे वाटले. आपल्याकडे बारामाही वाहणाऱ्या, स्वच्छ पाण्याच्या नद्या-ओहोळे हल्ली दिसतच नसतात. हजारो भाविक तेथे जमले होते तरी कुठेही अस्वच्छता किंवा गोंगाट नव्हता, किंवा भाविकांकडून पैसे लुबाडण्याचा कुठल्याही क्लुप्त्या इथे वापरल्या जात नव्हत्या. जगभर सगळीकडे चर्चमध्ये मिस्साविधीत अर्पणविधीच्या दरम्यान डोनेशन बॉक्स फिरवला जातो, तेव्हढा एकमात्र अपवाद.
त्यानंतर आमच्या हॉटेलकडे परतत होते, तेव्हा आताच झालेल्या मिस्साविधीचे पौराहित्य करणारे कार्डिनलमहाशय एका गृहस्थाबरोबर पायी चालत आपल्या निवासस्थानाकडे जाताना दिसले आणि मी थबकलो.
माझ्या आयुष्यात तोपर्यंत मी खूप कमी कार्डिनलांना प्रत्यक्ष पहिले होते. मूळचे गोव्यातील असलेले आणि पाकिस्तानातील कराचीचे कार्डिनल जोसेफ क्वार्डेरो यांची पणजीत मी ‘नवहिंद टाइम्स’चे बातमीदार म्हणून १९८३ साली मुलाखत घेतली होती, मुंबईचे कार्डिनल सायमन पिमेन्टा यांना अनेकदा धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांत पहिले होते.
गोव्यात आलेल्या पोप जॉन पॉल दुसरे यांना पोपमोबाईलमधून फिरत भाविकांना दर्शन देताना, नंतर उंचावरच्या मंडपात मिस्साविधी करताना पाहिले होते. कॅथोलिक चर्चमध्ये सर्वोच्च धर्मगुरु पोप असतात, तर ‘प्रिन्स ऑफ द चर्च’ म्हणून ओळखले जाणारे शंभराच्या आसपास कार्डिनल्स असतात, पोपपदाची जागा खाली झाल्यावर या कार्डिनल्समधून एकाची पोप म्हणून सर्वानुमते निवड होते. आपल्या खंडप्राय भारतात कार्डिनल्सची संख्या सहाहून अधिक नसते. त्यामुळे या पदाविषयी कुणाही कॅथोलिक व्यक्तीला अप्रूप वाटणार हे साहजिकच आहे.
त्यामुळे त्या रस्त्यावर अगदी सामान्य लोकांप्रमाणे बोलतबोलत पायी चालणाऱ्या या कार्डिनलकडे काही क्षण मी पाहतच राहिलो. त्यांच्याविषयी मी जॅकलिनशी काही बोललोसुद्धा. मात्र युरोपमध्ये कार्डिनलची संख्या भरपूर असते. एवीतेवी समाजातील धर्माचे स्थान आणि महत्त्व युरोपातील समाजात झपाट्याने कमी होत असताना रस्त्याने चालणाऱ्या कार्डिनलकडे कोण लक्ष देणार होते?
आमच्या या हॉटेलमधल्या वास्तव्यात घडलेली ही घटना येथे सांगायलाच हवी. हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरपाशी मी उभा होतो तेव्हा एक महिला तेथे क्लार्कशी बोलत होती, आमच्याप्रमाणे तीही आशियाई देशातील होती हे नक्कीच होते.
का कुणास ठाऊक, त्या महिलेने मला एकदम विचारले, “आर यु फ्रॉम इंडिया ?”
मी ‘हो’ म्हणताच तिने विचारले, “व्हिच सिटी?”
परदेशात त्या महिलेच्या या प्रश्नाला ‘पिंपरी चिंचवड’ असे उत्तर कसे द्यावे म्हणून मी पटकन म्हटले, “बॉंबे.”
माझ्या त्या उत्तरावर त्या महिलेचा चित्कारुन दिलेला प्रतिसाद ऐकून मी एकदम थंडगार पडलो..
“हो का, किती छान ! आम्ही पण मुंबईचेच, चेंबूरहून आमचा वीस जणांचा ग्रुप आताच आलाय !”
फ्रान्समध्ये लुईस शहरातल्या हॉटेलात मराठीतून बोलणारे कुणी भेटेल अशी मी कल्पनाच केली नव्हती. भारताप्रमाणेच अनेक देशांतील कॅथोलिक भाविक मोठ्या संख्येने या तीर्थक्षेत्राला मोठ्या संख्येने भेट देत असतात असे यावेळी माझ्या लक्षात आले.
कुठल्याही सहलीसाठी बाहेरगावी गेले म्हणजे खरेदी होणारच. हे तीर्थक्षेत्रसुद्धा त्याला अपवाद राहण्याचे कारण नाही. इथल्या बाजारपेठेत बहुसंख्य ग्राहक अर्थातच या तीर्थक्षेत्राच्या भेटीवर असलेले भाविकच होते, त्यांना भावतील अशा अनेक धार्मिक आणि इतर भेटवस्तूंची इतर खूप दुकाने होती. काही दिवसांपूर्वी पॅरीसमध्ये असताना आम्ही एफेल टॉवरच्या प्रतिकृती असलेल्या कि-चेन वगैरेंसारख्या अनेक सुव्हेनिअर्स म्हणजे स्मरणिका विकत घेतल्या होत्या. अगदी तशाच पद्धतीने खास लुईसची म्हणजे मदर मेरी, बेर्नादेत, मानवी आकाराच्या मेणाच्या आकृती आणि इथल्या इतर स्मरणीय वास्तूंची प्रतिकृती असलेल्या वस्तूंना इथे प्रचंड मागणी होती. तिथल्या त्या तीनचार दिवसांच्या वास्तव्यात तिथल्या बेभरवशाच्या वातावरणाचा अनुभव घेतला.
आम्ही युरोपवर या दौऱ्यावर आलो होतो तेव्हा तिथला हिवाळा नुकताच संपून स्प्रिंग ऋतू सुरु झाला होता. हॉटेलच्या रुममधून बाहेर पडताना निळेभोर आकाश असताना अचानक आभाळ भरून यायचे आणि पावसाची सर यायची आणि पुन्हा एकदा आभाळ स्वच्छ व्हायचे. स्थानिक लोकांच्या बोलण्यातून नंतर कळाले कि हवामानखात्याने त्यादिवशी पावसाच्या एकदोन सरींबाबत इशारा दिला होता.
चार दिवसांच्या वास्तव्यानंतर लुईस येथील पॅरीसला परतताना मला खूप वर्षांपूर्वी बल्गेरियातील विविध शहरांना दिलेल्या भेटींची आठवण झाली. गोव्यात नवहिंद टाइम्सचा बातमीदार असताना या इंग्रजी दैनिकाने मला पत्रकारितेचा डिप्लोमा अभ्यासक्रम करण्यासाठी रशिया आणि बल्गेरियाला १९८६ साली पाठवले होते. बल्गेरियात असताना त्यावेळी पूर्णतः पारंपरिक उर्जेवर अवलंबून राहून विविध ग्रामोद्योग करणाऱ्या एका खेडेगावाला आम्ही भारतीय पत्रकारांनी भेट दिली होती. त्यावेळी वाहत्या पाण्याचा आपण विहिरीच्या मोटेवर उपयोग करायचो त्या पध्दतीने सुताराची, लोहाराची, कुंभाराची वेगवेगळे कामे तेथे होताना मी पाहिली.
दुसऱ्या एका शहरात ‘इंटरनॅशनल म्युझियम ऑफ ह्युमर’ उभारण्यात आले होते. त्या हास्यसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारापाशीच एका खिंकाळणाऱ्या गाढवाच्या पाठीवर पाठमोरा बसलेल्या एका माणसाचे शिल्प होते आणि आतमध्ये कुणाही व्यक्तीला हसू फुटेल अशी शिल्पे, चित्रे, व्यंगचित्रे, फोटो आणि यात्रेत आपण लहानपणी पाहत असू तशी गोलाकार, लंबोळकी आरसे होते त्यातून वेगवेगळ्या प्रकारची हास्यास्पद प्रतिबिंबे दिसायचे. अनेक पडद्यांवर चार्ली चॅप्लिनची मूक चित्रपटे चालू होती, आणि भारतातील हिंदुस्थान टाइम्सचे व्यंगचित्रकार सुधिर धर यांचीही काही व्यंगचित्रे तिथे होती. विशेष म्हणजे कुठल्याही भाषेची मदत न घेता हसता येतील अशा त्या सर्व कलाकृती होत्या.
बल्गेरियातील त्या शहरांत विशिष्ट विषय व मुद्दा घेऊन त्यात्या शहराचे मार्केटिंग करुन त्या शहरांत पर्यटक आकर्षित केले जात होते. आणि या शहरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन क्षेत्रे म्हणून स्थान देण्यात आले होते.
फ्रान्समधल्या लुर्डस या शहरानेसुद्धा गेल्या शतकातल्या बेर्नादेत या मुलीच्या जीवनात घडलेल्या कथित घटनेचे भांडवल बनवून या शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘मेरियन डिव्होशन सेंटर’ बनवले आहे. फ्रान्समधील हे एक महत्त्वाचे ‘पिलग्रिम टुरीझम’ केंद्र बनले आहे, शहराची अर्थव्यवस्था या धार्मिक घटनेभोवती गुंफलेली आहे. येथील स्थानिक लोक आणि हॉटेल आणि दुकाने चालवणारे लोक जगभरातून येथे येणाऱ्या भाविकांना विविध प्रकारच्या सेवासुविधा पुरवतात. बेनार्देतच्या जीवनात घडलेल्या मदर मेरीच्या दर्शनाच्या त्या दैवी घटनेवर आताच्या स्थानिक लोकांचा आणि इतर व्यावसायिकांचा विश्वास असेलच याविषयी मला खरे तर शंका आहे.
गेल्या काही दशकांत युरोपमध्ये आणि एकूणच सर्वच पाश्चिमात्य राष्ट्रांत धर्माचे स्तोम एकदम कमी झाले आहे. जन्माने ख्रिस्ती असले तरी यापैकी बहुतेक जण आता नास्तिक बनले आहेत. युरोपात आणि विशेषतः रोममधील प्राचीन चर्चेसला भेट देताना ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. फ्रान्समधल्या लुईस शहरात किंवा पोर्तुगालमधल्या फातिमा या शहरात मदर मेरीच्या दर्शनाबाबतच्या त्या दैवी घटनेशी स्थानिक रहिवाश्यांना आणि व्यवसायिकांना कदाचित देणेघेणेही नसेल. त्या घटनेबाबत लोकांच्या श्रद्धेमुळे त्यांना चरितार्थाचे साधन मिळते आहे, यामुळे मात्र ते समाधानी आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील किंबहुना जगातील कुठल्याही धर्माच्या तीर्थक्षेत्रांतील स्थानिक रहिवाश्यांच्या आणि व्यावसायिकांच्या अशा प्रातिनिधिक भावना असू शकतील यात शंका नाही. त्यामुळेच अशा श्रद्धास्थानांवर आघात करणे टाळले जात असावे.
कृपया, लेख वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा