पर्वरी | ३१ ऑगस्ट | प्रतिनिधी
official language of goa राजभाषा कायद्यातून मराठीला वगळावे ही लेखक दामोदर मावजो यांची भाषा अत्यंत कृतघ्न आणि विषारी आहे. त्यामुळे त्यांनी समस्त गोवेकरांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात मराठीप्रेमी स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा कवयित्री डॉ.आरती दिनकर यांनी दिला. ‘मराठी राजभाषा लढा’ आता अधिक तीव्र करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मराठी आमची मायबोली या समुहाच्यावतीने पर्वरी येथील मराठी भवनात आयोजित निषेधसभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर कवी उदय ताम्हणकर, प्रकाश भगत, राजेश वळवईकर, विनोद पोकळे उपस्थित होते.
यावेळी मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या फोंड्यात सकाळी ११ वाजता होणाऱ्या निषेध सभेला जमण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सभेच्या अध्यक्ष म्हणून बोलताना आरती दिनकर म्हणाल्या, राज्यात सध्या कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा आहे. तो मराठीला मिळावा यासाठी मराठीप्रेमी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. कोकणीला राजभाषेचा दर्जा असतानाही त्यांना असुरक्षितता का वाटते ? मराठी भाषा समृद्ध, सुसंस्कृत, देवभाषा आहे. संस्काराची भाषा आहे. त्यामुळे ज्ञानपीठ सारख्या पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी किमान इतर भाषांचा द्वेष करू नये. या निमित्ताने मावजो यांनी आपला खुजेपणा दाखवून दिला आहे.
विनोद पोकळे म्हणाले की, गोव्याची राजभाषा होण्याचा मराठीचा नैसर्गिक अधिकार डावलला गेला आणि कपट कारस्थाने करून कोकणी राजभाषा केली. मराठीला तिचे हक्काचे स्थान मिळावे यासाठी हा लढा आणखी जोमाने पुढे नेणार आहोत. प्रत्येक तालुक्यात मावजोचा निषेध आणि मराठी राजभाषा निर्धार सभा घेतल्या जाणार आहेत.
यावेळी राजेश वळवईकर म्हणाले, बहुजन समाजाच्या अभिमानाची भाषा असलेल्या मराठीचा अपमान सहन करणार नाही. मराठी भाषिकांच्या लढ्याला माझा नेहमीच पाठिंबा राहील. मराठी राजभाषा होईपर्यंत आपण आता गप्प राहता कामा नये. मराठीचा आधार घेऊन मोठे झालेल्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे, असे उदय ताम्हणकर म्हणाले.
मराठीचा आधार घेऊनच मावजो यांनी ज्ञानपीठ मिळवले आहे. त्यांची पुस्तके मराठीत आली नसती तर त्यांना कोणीही विचारले नसते. तेव्हा त्यांनी मराठीचे उपकार विसरू नये असे पल्लवी मराठे यांनी सांगितले.
यावेळी अशोक लोटलीकर, गौरीश नाईक, महेश नागवेकर, राजाराम पाटील, मच्छिंद्र च्यारी, पौर्णिमा देसाई, ॲड.वल्लभ देसाई, ॲड.अजितसिंग राणे, प्रभाकर ढगे, अशोक घाडी, अनिल पाटील, अशोक लोटलीकर यांची भाषणे झाली. सभेचे प्रास्तविक व सूत्रसंचालन प्रकाश भगत यांनी केले. गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी आभार मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा