श्रीरामपूर | ९ ऑगस्ट | शफीक बागवान
politics लोकसभा निवडणुकीत घोषणा केल्याप्रमाणे pmkvy कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे उदासीन आहेत. हजारो सुशिक्षित बेरोजगार विखे यांच्या या आश्वासन पूर्तीकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना कार्यक्रमांतर्गत बेरोजगार तरुणांना इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, बांधकाम, अन्न प्रक्रिया, हस्तकला, फर्निचर आणि फिटिंग्ज, रत्ने आणि दागिने आणि चामड्याच्या तंत्रज्ञानासह तांत्रिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत केंद्र सरकार युवकांना उद्योजक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम देणार आहे.
केंद्र सरकारने बेरोजगार व आर्थिकदृष्ट्या बळकट नसलेले नागरिक यांचा विचार करून त्यांच्या भविष्यासाठी व जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी ही कौशल्य विकास योजना सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्या महायुतीने मोठा पराभव पत्करल्या नंतर अलीकडेच राज्यभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या तीन चाकी सरकारने अनेक योजना आणि त्या संदर्भातील आश्वासनांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपुरात लवकरच कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येईल, असे मोठे आश्वासन दिले होते. अद्याप या आश्वासनाला कोणतेही फळ आले नाही.
तालुका क्रीडा संकुल, श्रीरामपूर बसस्थानक, नवीन श्रीरामपूर जिल्हा, तालुका पंचायत समितीच्या इमारतीचे रखडलेले काम, बंद असलेल्या मुळा प्रवरा वीज संस्था सुरू करण्यासंदर्भातील मंदावलेल्या हालचाली आणि जल जिवन योजनेचे वाजलेले तीन तेरा यासह तालुक्यात आजही गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश प्रश्न रेंगाळले आहेत.
पालकमंत्री पद घेऊन विखे यांना अडीच तीन वर्षांचा काळ लोटला आहे. कोणतीही मागणी नसताना अपर जिल्हाधिकारी कार्यालय त्यांनी शिर्डी येथे सुरू करून श्रीरामपूर तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
कौशल्य विकास केंद्राबरोबरच श्रीरामपूर नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी मोठा भूखंड देण्याची ही त्यांनी घोषणा केली होती, तिही गुलदस्त्यातच आहे. मुळा प्रवरा वीज संस्था सुरू करण्यासंदर्भातील त्यांची अनेक आश्वासने आजही अनेक जण आठवीत आहेत.
विखे यांना श्रीरामपूर तालुक्याचे सोने करण्याची संधी असताना देखील एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही याबाबत मतदार राग व्यक्त करीत आहेत.
श्रीरामपूरच्या बसस्थानकास अवकळा प्राप्त झाली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून भुयारी गटारीचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. तो आता सर्वांच्या विस्मरणात गेला आहे.
श्रीरामपूर तालुका पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्नही अडगळीला पडला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व त्या प्रश्नांबाबत विखे विरोधक मोठे भांडवल करणार आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. कौशल्य विकास केंद्रासंदर्भात विखे यांनी केलेली घोषणा आचारसंहितेमुळे हवेत विरणार आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area