सत्यकथा | भैरवनाथ वाकळे
बावळट चोर : चंदनाच्या झाडाने दिला चकवा
चोर म्हटल्यावर आपल्यासमोर लाल पांढऱ्या चट्ट्यापट्ट्याचा टीशर्ट, डोळ्यावर लावलेली पट्टी, हातात रामपुरी चाकू आणि अंधारातील राजा अशी प्रतिमा उभी रहाते. परंतु अनेक लेखकांनी, वृत्तपत्रांनी चोरांच्या बावळटपणाच्या विविध बातम्या लिहलेल्या आपण वाचल्या असतील. बावळट शार्विलकांच्या अनेक सत्यकथा फार पुर्वीपासून साहित्यक्षेत्रात प्रसिध्द आहेत.
नुकतीच आपण सहित्यप्रेमी चोराची बातमी काही दिवसांपुर्वी वाचली असेल. कवी नारायण सुर्वे यांच्या घरी चोर चोरी करून गेला. टिव्हीसह अनेक वस्तू घेऊन गेला, पण नंतर वर्तमानपत्रात बातमी वाचून त्याला कळले की, आपण फार मोठ्या माणसाच्या घरी चोरी केली. त्याने रात्री सुर्वेंच्या घरी परत जावून सर्व वस्तू पुन्हा जागेवर ठेवल्या. सोबत माफीनाम्याचे पत्र लिहून ठेवले.
असाच किस्सा अहमदनगरमधे घडला. वीरप्पन नावाचा चंदनचोर सर्वांना माहिती आहे. असे अनेक छोटेमोठे लोकल वीरप्पन महाराष्ट्रभर आहेत तसेच अहमदनगरमधेही असावेत. कारण शहर परिसरातील अनेक चंदनाच्या खोडांवर चौकोन भोकं पाडलेली आपल्याला दिसतात. अशाच एका लोकल विरप्पनच्या बावळटपणाचा हा अहमदनगरमधील किस्सा. तसे पाहिले तर हे लोकल वीरप्पन फार डेअरिंगबाज. थेट जिल्हाधिकारी निवासातील चंदनाची झाडे चोरतात तर काही लष्कराच्या हद्दीतील. रात्रपाळी ड्युटीवरील चौकीदाराला चकवा देण्यात ते माहीर असतात.
एका शाळेच्या परिसरात हा शार्विलक गेला. त्याने दिवसभरात चंदनाचे झाड हेरून ठेवलेले असावे. रात्रीच्या अंधारात वॉचमनला चकवा देत थेट झाडाच्या खोडाला चौकोन भोक पाडले. झाडाच्या खोडात किती चंदन निघेल याचा अंदाज घेतला. अंदाज काय निघाला असेल हे त्यालाच माहिती. झाड न कापताच तो निघून गेला. चंदनाचे झाड वाचले.
सकाळी पाहिले तर चंदनाच्या झाडानेच चोराला चकवा दिल्याचे दिसून आले. चोराने रात्रीच्या गर्द अंधारात झाडाला चौकोन भोक पाडून गाभ्यातून किती चंदन निघेल याचा अंदाज घेतला ते झाड चंदनाचे नव्हे अशोकाचे होते. असा हा अहमदनगरमधील शर्विलकाच्या बावळटपणा सत्यकिस्सा.
(सोबत झाडांची छायाचित्रे दिली आहेत, कृपया, ठिकाण विचारू नये)