वांबोरी | प्रतिनिधी
आजच्या राजकारणात काहीही घडू शकते पण मी निष्ठावंत राहिल्याचा मला अभिमान आहे. अनेक प्रलोभने दाखवण्यात आली, पण मी त्याला बळी पडलो नाही. कुणाचा विश्वासघात केला नाही, त्यामुळे मला सुखाची झोप लागते. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. कला व साहित्यातून समाजजीवन अधोरेखित होते. ग्रामीण भागात भरणाऱ्या कला महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, त्यामुळे ग्रामीण भरणारा हा कला महोत्सव भविष्याची नांदी ठरेल व यातूनच कलाकार घडतील, असा विश्वास आ. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
वांबोरी साहित्य मित्र मंडळ आयोजित तिसऱ्या वांबोरी कला महोत्सवात आमदार तनपुरे बोलत होते. यावेळी मंचावर निसर्गमित्र संदीप राठोड, वांबोरीचे सरपंच किरण ससाणे, माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना व स्वागताध्यक्षा अचला झंवर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे तनपुरे म्हणाले, माझ्या शिक्षणाचा उपयोग राजकारणात होत असून मी गरज पडेल तसे वरिष्ठांचे सल्ले घेतो. लोकांना भेटणे, त्यांचे सुख-दुःख वाटून घेणे व सामाजिक क्षेत्रात काम, हीच आवड असल्याने मी राजकारणात आलो. वृक्षमित्र योजना काळाची गरज असल्याने त्यासाठी विशेष प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निसर्गमित्र संदीप राठोड यांनी झाडांचे आनंदवन कसे उभे राहिले हा प्रवास अधोरेखित केला. झाडांची गरज खूप महत्वाची असून निसर्ग आहे तर आपण आहोत हे त्यांनी पटवून दिले.
अनुराधा प्रकाशन व प्रकाशक मिलिंद काटे यांच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन शंकर शेवाळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला. त्यात जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पुस्तके जिंकली. शासकीय परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गणेश दांगट व आश्विनी तागड यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रकाश बाफना, डॉ.विशाल तिडके, माणिक पागिरे, भाऊसाहेब साठे, प्रमोद चोथे, मंगल परदेशी व सादिक कोतवाल यांना वांबोरी विशेष सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आ. प्राजक्त तनपुरे व निसर्गमित्र संदीप राठोड यांची मुलाखत विशेष रंगली. अशोक व्यवहारे व आशिष निनगुरकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार तनपुरे व राठोड यांची दिलखुलास उत्तरे उपस्थितांची वाहवा मिळवून गेली.
येथील आशिष निनगुरकर यांच्या ‘सिनेमा डॉट कॉम’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वांबोरी व परिसरातील बालकलावंतांनी सादर केलेल्या पोवाडा गायन, काव्य गायन, भाषण व नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रचंड दाद मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिदास ससाणे, आदिनाथ पागिरे, निवृत्ती पाटील, संतोष महापुडे, अमोल ससाणे, स्वरूप कासार, आदिनाथ पागिरे, गणेश जगताप व शमवेल मकासरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक व्यवहारे यांनी केले तर आभार नासिर कोतवाल यांनी मानले. उत्तरोत्तर रंगलेल्या या कला महोत्सव कार्यक्रमाला वांबोरी रसिकांनी मोठ्या प्रमाणावर दाद दिली.