जामखेड | रिजवान शेख, जवळा
तालुक्यातील जवळ्याचे ग्रामदैवत जवळेश्वर महाराज रथयात्रोत्सव अतिशय जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिम्मित दरवर्षी प्रमाणे गावामध्ये भव्य हगामा कुस्ती मैदान भरवले जाते. समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मैदान भरवले जाते. यासाठी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच विधान परिषदेचे आ. माजी मंत्री राम शिंदेनी मैदानासाठी सहकार्य केले. हगामा कुस्ती मैदानासाठी जामखेड, करमाळा, परांडा, कर्जत, श्रीगोंदा तसेच विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील मल्लानी आपली ताकत आजमावली.
कुस्ती मैदानासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये नामवंत पैलवान अर्जुनवीर पुरस्कार, २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेते राहुल आवारे यांचे वडील बाळासाहेब आवारे उपस्थित होते. त्यांच्या मागदर्शनाखाली नामवंत मल्लांच्या मोठ्या कुस्त्या घेतल्या. त्यामध्ये ग्रीको महाराष्ट्र चॅम्पियन संकेत हजारे हे या मैदानासाठी उपस्थित होते. बाबा महारणावर यांच्या तालमीतीत मानअभिमान केसरी पदक विजेते पै. रोहित आव्हाड आणि गुटाळ पैलवान यांच्यामध्ये अतिशय चुरशीची अंतिम कुस्ती झाली. कुस्ती बराच वेळ सुरू होती म्हणून कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. सहभागी मल्लांना प्रोत्साहनासाठी कुस्ती शौकिनांनी बक्षिसे देत त्यांचे कौतुक केले.
हगाम्यांसाठी बाबा वस्ताद महारणावर, राजू भाई वस्ताद, शकील शेख, जमाल शेख, संजय आव्हाड यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी सरपंच सुशील आव्हाड, उपसरपंच प्रशांत शिंदे, ज्योति क्रांति मल्टिस्टेटचे चेअरमन अजिनाथ हजारे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, प्रेम आव्हाड, डॉ.दीपक वाळुंजकर, बाळासाहेब आव्हाड, राजू महाजन, रफिक शेख, अजित लेकुरवाळे, नितीन कोल्हे, संतराम सुळ, नय्युम शेख आदी मान्यवरांनी हागाम्याचा आस्वाद घेत प्रोत्साहन देत पैलवानांचे कौतुक केले.