मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांच्या लूटीविरूध्द राजाभाऊ देशमुख आक्रमक; व्यापारी परवाने रद्द करण्याची मागणी - Rayat Samachar

मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांच्या लूटीविरूध्द राजाभाऊ देशमुख आक्रमक; व्यापारी परवाने रद्द करण्याची मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

जालना | प्रतिनिधी

येथील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई पंचक्रोशीतील मिर्ची उत्पादक शेतकरी बांधवांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यांना समक्ष भेटून व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीवर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी आरोप केला की, खरेदीदर आधी निश्चित केल्यानंतर कमी भावाने मिर्चीची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांना फसवून कमी पैशात त्यांची मिर्ची विकत घेतली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी राजाभाऊ देशमुख यांना तक्रार करत बाजार समिती सभापतींना भेटून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, बाजार समितीकडून शेतकऱ्यांना मदतीसह मार्गदर्शन व्हावे आणि फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या संदर्भात जाब विचारला असता व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. फसवणूकीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी जालना काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर देशमुख यांनी गांभीर्याने लक्ष देत बाजार समिती सभापतींची भेट घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासह लायसन्स रद्द करण्याची मागणी केली.

या लूटीविरोधात बाजार समिती सभापतींनी लवकरात लवकरच बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Share This Article
Leave a comment