कोल्हार | प्रतिनिधी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहाता तालुका सेक्रेटरी कॉ. सुरेश पानसरे यांच्या मातोश्री गंगुबाई भिमाशंकर पानसरे यांचे शनिवारी ता. १३ रोजी वयाच्या नव्वदव्या वर्षी वृद्धापकाळाने कोल्हार येथील राहत्या घरी निधन झाले. गंगुबाई पानसरे या तात्कालिन लालनिशान पक्षाचे व आत्ताच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते दिवंगत भिमाशंकर पानसरे यांच्या पत्नी होत्या तसेच शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या भावजई होत्या.
त्यांच्या पश्चात तिन मुले व तिन मुली असून संपुर्ण आयुष्यात त्यांनी आपले पती दिवंगत कॉम्रेड भिमाशंकर पानसरे यांना मोलाची साथ दिली. रात्री बेरात्री कॉम्रेड पानसरे यांचे चळवळीतील सहकारी घरी आल्यानंतर त्यांना स्वयंपाक करून जेवण करणे यासाठी त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांचे समकालीन कॉ.श्रीधर आदिक, कॉ.भि.र. बावके, कॉ.दत्ता देशमुख, अ.बा.ईनामदार, मधुकर कात्रे, सुरेश गवळी, वसंतराव सुरुडे, बाबुराव चोखर आदी कम्युनिस्ट मंडळींचे घरी कायमच येणेजाणे असायचे. हि सर्व मंडळी गंगुबाई पानसरे तथा बाई हिच्या हातचे जेवण केल्याशिवाय जात नसत. अतिशय घरातीलच मंडळी असल्यासारखा वावर वरील कॉम्रेड मंडळीचा घरात असायचा.
हिच परंपरा त्यांचे चिरंजीव कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी चालु ठेवली आहे. पानसरे घराणे हे चळवळीतील व डाव्या विचारसरणीचे घराणे परंतु श्रीमती बाई या अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. ॲड.सुभाष लांडे, राष्ट्रीय सचिव कॉ.डॉ.भालचंद्र कानगो, जिल्हा सचिव ॲड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. ॲड. सुधिर टोकेकर, कॉ. मिलींद रानडे यांनी तिव्र दुःख व्यत केले.
अहमदनगर जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक कामगार संघटना तसेच
रयत समाचार वृत्तपत्र समुहाच्या वतीने बाईंना भावपुर्ण श्रद्धांजली, अखेरचा लाल सलाम.