अहमदनगर । किरण डहाळे
अहमदनगरची ओळख असलेला चाँदबिबीचा महाल म्हणजे खरं तर सलाबतखानाची कबर आहे. शहरापासून दूर आणि आरोग्यासाठी उत्तम असं हवामान असल्याने येथे अनेक मॉर्निंग ग्रुप आहेत. हे ग्रुप ही ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी वेळ मिळेल तेव्हा तिथे स्वच्छता मोहिम राबवतात. आणि या स्वच्छता मोहिमेत दारुच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा गोळा करून तो परिसर स्वच्छ ठेवतात. जी काळजी पुरातत्व विभागाने घ्यायला हवी ती हे मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सातत्याने घेतात.
दोन दिवसांपूर्वी कोणा सन्माननीय व्यक्तीचा वाढदिवस या सलाबत खानाच्या कबरीजवळ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. उडत्या चालीच्या गाण्यांवर तिथं सामुहिक नृत्य प्रदर्शन झाले. आणि एरवी शांत असणारा आणि म्हणूनच रम्य भासणारा हा परिसर कमालीचा ओंगळवाणा भासला. समाज माध्यमांवर या वाढदिवसाची दृश्ये झपाट्याने पसरली. पण कदाचित याची माहिती पुरातत्व विभागाला नसावी. यासंदर्भात इतिहास प्रेमी सुरज कपाले यांनी पुरातत्व विभागाकडे तक्रार केली आहे. अधिक माहितीसाठी रयत समचारने पुरातत्व विभागाचे अधिकारी एस. एन. महाजन यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांनी आमचे फोन उचलले नाहीत. त्यामुळे झाला प्रकार दडपण्यासाठी महाजन यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.
ज्यांचा वाढदिवस झाला त्यांना शुभेच्छा. पण कबरीजवळ जन्मदिवस साजरा करणं हे कितपत योग्य आहे याचं भान संबंधितांनी राखणं गरजेचं होतं.
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो या उक्तीनुसार भविष्यात अशा प्रसंगांना आळा घातला गेला नाही तर या महाला भोवती कॅम्पिंगच्या नावाखाली डान्सबार सुरु व्हायला वेळ लागणार नाही. पुण्याजवळ पवना धरणाच्या काठाशी हे प्रकार सर्रास सुरु आहेत. पण तिथे अशी कुठलीही ऐतिहासिक वास्तू नाही.
युट्यूबर्सना कायम कायदयाचा धाक दाखवणारा पुरातत्व विभाग चांदबिबी महालावर, सलाबत खानाच्या कबरी जवळ झालेल्या या डान्सपार्टी विरोधात काय कारवाई करणार याकडे इतिहासप्रेमी अहमदनगर डोळे लावून बसले आहेत.
झोपेतून जागे करणं सोपे आहे पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं आहे त्यांना ही जाग कधी येणार हा मोठा प्रश्न आहे.
जमावबंदी कलम : खा. निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या दुध व कांदा दर यावर जनआंदोलन उभे करताच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागु केला. तो शेतकरी यांनी जमु नये म्हणून, पण धनदांडगे राष्ट्रीय संरक्षित स्मारक जागेत नियम तोडून धिंगाणा घालत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
– इंजी. अभिजीत एकनाथ वाघ, इतिहासप्रेमी मंडळ, अहमदनगर