साहित्यवार्ता
धर्म म्हणजे काय ?
पांडवगीतेत श्रीकृष्ण एकदा दुर्योधनास विचारतात की तू असे का वागतोस? स्वतःचे काही चुकते असे तुला वाटत नाही का? त्यावर दुर्योधनाने दिलेले मार्मिक उत्तर फार प्रसिद्ध आहे.
तो म्हणतो :
जान्यामि धर्मम् न च मे प्रवृत्ति:
जान्यामि अधर्मम् न च मे निवृत्ति:
(जान्यामि धर्म॔म् न च मे प्रवृतिर्जानाम्यधर्म्म् न च मे निवृत्ति:)
म्हणजे काय तर मी धर्म म्हणजे काय हे मी जाणतो पण त्याकडे माझी प्रवृत्ती होत नाही.
अधर्म म्हणजे काय हे मला समजते, पण मी त्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. श्रीकृष्ण दुर्योधनास त्याच्या वर्तनाविषयी विचारतात, खरे तर त्यांची विचारणा दुर्योधनाच्या सातत्यपूर्ण दुर्वर्तनाविषयी आहे व दुर्योधन मात्र धर्म – अधर्माचा उहापोह करतोय !
हे काय गौडबंगाल आहे ?
महाभारतकालीन धर्माचे व सद्यकालीन धर्माचे रूप भिन्न असल्याचे यातून स्पष्ट होते. दुर्योधन त्याच्या वर्तनातील नीती अनीतीच्या संदर्भात बोलत आहे. महाभारत कालीन धर्म विचार हा नीतीसुसंगत वर्तन विचार होता. नीती म्हणजे धर्म, नीतीने वागणे म्हणजे धर्माचरण आणि अनीती म्हणजे अधर्म, अनीतीने वागणे म्हणजे अधर्म असा अगदी सहजसोपा धर्म – अधर्माचा अर्थ होता.
भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतो –
यतो धर्म स्ततो जयः
भगवंताच्या या वचनातूनही धर्म हा नीतीशीच निगडीत आहे. नीती म्हणजेच सत्य. सत्याची बाजू, सद्वर्तण म्हणजे धर्म.असत्य म्हणजे अनीती आणि असत्याची बाजू, दुर्वर्तण म्हणजे अधर्म.
रामायणात शिव आहे शिवाची उपासना आहे, राम वाळूच्या शिवलिंगाची पूजा करतो, रावण परम शिवभक्त आहे तो कठोर तपाचरण करून शिवास प्रसन्न करून घेतो. महाभारतात शिवलिंग म्हणजे काय याचे तात्विक विवेचन आहे. शिव, शक्ती व गणेश ही उच्चकोटीतील दैवते होती व त्यांची उपासना ही आत्मिक, आध्यात्मिक स्तरावरील संकल्पना होती मात्र धर्म व अधर्माचा गाभा नीतीयुक्त वर्तन किंवा अनीतीयुक्त वर्तनाशीच निगडीत होता. हरप्पन- मोहोंजदरो संस्कृतीतही लिंगपूजा आहे, शिस्नदेव आहे पण यातील देव मंदिरात स्थापित नव्हता. सारी प्राचीन शिवलिंगे उघड्यावर, जलाशयाकाठी, नदी – ओहळ ओढे यांच्या खडकाळ पात्रात आढळतात. हरतालिकेसही वाळूचे शिवलिंग असते. महाभारतात व विशेषकरून कृष्णचरित्रात उत्सव आहेत. वसंतोत्सव- कौमुदीउत्सव असे. मंदिरे व त्यामधील देवतांचे उत्सव नाहीत. अर्जुन व सुभद्रा यांची भेट अशाच एका उत्सवात झाली होती. कृष्णाने गोवर्धन प्रसंगात इंद्रास नाकारून त्यास आव्हान दिले. म्हणजेच इंद्र वरूणादी वैदिक देवता व त्यांचे पूजन महाभारत काळापर्यंत क्षीण अवस्थेत की होईना चालू होते.
श्रीकृष्णाने क्रांती केली व वैदिक प्रथा परंपरा नाकारल्या.
श्रीराम व श्रीकृष्ण यांना त्यांच्या काळातच अलौकिकत्व प्राप्त झाले असले तरी त्यांचे दैवतीकरण महाभारतावरील दीर्घकाळपर्यंत झाले नव्हते. हरिवंश हा ग्रंथ महाभारतानंतर काही शतकांनी लिहिला गेला व हरिवंश हा महाभारताचा एक भाग म्हणूनही खूप उशीरा संलग्न केला गेला.
शिव, शक्ती, गणेश, वीरभद्र-कालभैरवादि दैवते म्हणून प्रस्थापित झाली त्यानंतर अनेक शतकांनी श्रीराम व श्रीकृष्ण यांचे दैवतीकरण झाले. या सर्व प्रक्रियेस आद्य शंकराचार्यांच्या काळात विलक्षण गती प्राप्त झाली.
भारतात आधी गुहा मंदिरे निर्माण झाली व नंतर मंदिर स्थापत्य शैलीचा प्रारंभ झाला. सर्वात प्राचीन मंदिरे चौथ्या शतकापासूनची आहेत.
भक्तीमार्गाचा प्रारंभ चौदाव्या शतकात झाला व श्रीराम व श्रीकृष्ण भक्तीस उधाण आले. दक्षिणेतील भक्तीमार्ग याहून जुना असला तरी तो दक्षिणेतच मर्यादित राहिला होता.
महाराष्ट्रात यादवांच्या अखेरच्या काळातील यादवांचा प्रधान हेमाद्रीपंत याने देव्हारा, पूजाविधी व व्रतवैकल्ये यांचे खूप स्तोम माजवले व त्यामुळे धर्मास आजचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्रात शिवोपासना – शिव शक्ती व भैरव आदींची उपासना पूर्वापार आहे. याशिवाय खंडोबा, ज्योतिबा, विठोबा हे सारे लोकदेव आहेत – यांचा साधासुधा लोकधर्म आहे. देवी,खंडोबाचा गोंधळ व कालभैरवाचा भराड हे सहजसोपे पूजा विधी आहेत.
चौथ्या – आठव्या शतकानंतर धर्म क्लिष्ट होऊ लागला. अवडंबर, व्रतवैकल्ये व शिवशिवतात, सोवळे ओवळे यात अडकला. शेकडो देव देवता, अनेकानेक संप्रदाय, पंथ, त्यांच्या भिन्नभिन्न प्रथा परंपरा, शैव-वैष्णवादि भेद व पंथीय अहंकार व अस्मिता तसेच वर्णवर्चस्ववाद, पुजारी व पुरोहितवर्गाची एकाधिकारशाही यातून सध्याचा धर्म एक भूलभूलैय्या होऊन राहिला आहे.
दुर्योधनाची कर्मे भले वाईट असतील पण त्याने सांगितलेले धर्माचे नीती – अनीती संलग्न रूप हेच धर्माचे खरे शुद्ध रूप होय. महाभारत कालीन धर्मापासून आपण आज पूर्णपणे फारकत घेतली आहे.
– टी. एन. परदेशी
(उपर्युक्त श्लोकाचा उत्तरार्ध पुढील मंगळवारी)
संबंधित लेख रयत समाचार ईपेपरमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा