२१०० कोटींची निओ मेट्रो हवी की खड्डेमुक्त रस्ते? - महादेव खुडे - Rayat Samachar

२१०० कोटींची निओ मेट्रो हवी की खड्डेमुक्त रस्ते? – महादेव खुडे

1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

स्मार्ट सिटी बनविण्याच्या तथाकथित विकास प्रकल्पांतर्गत तब्बल २१०० कोटींचा निओ मेट्रो जोडबसचा प्रकल्प नाशिककरांच्या माथी मारण्याचे कारस्थान महानगरपालिकेचे भ्रष्ट प्रशासन, राज्य सरकार व इथले भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आखत असल्याचे दिसते.
संपूर्ण भारतात फसलेल्या नरेंद्र मोदींच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करुनही नाशिक शहर खड्डेमुक्त होऊ शकले नाही.त्यामुळे इथे साधी दुचाकी चालवताना मृत्यूशी खेळणाऱ्या नाशिककरांना खड्ड्यातून मेट्रो कशी पळेल असा प्रश्न पडलाय? असा परखड सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. महादेव खुडे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिकमध्ये कोणते प्रकल्प विहित कालावधीत व निश्चित बजेटमध्ये पूर्ण करण्यात आले यांची चौकशी करण्याचे ठरवले तर त्यासाठी मनपा इमारतीतच इडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची कार्यालये वाटावी लागतील, इतका स्मार्ट दरोडा पालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात आला आहे.
पावसाळ्यात शहरात फेरफटका मारला तर ‘खडे खोदण्याचे काम अन् ट्रॅफिक जॅम’ असे चित्र सार्वत्रिक आहे. खुद्द नाशिक मनपा ऐन पावसाळ्यात खड्ड्यात असताना निओ मेट्रोच्या बाता मारल्या जातात.
नाशिककरांनी आता ठरवले पाहिजे की, त्यांना निओ मेट्रो हवी की खड्डेमुक्त रस्ते, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव खुडे म्हणाले.

Share This Article
Leave a comment