शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास आत्मविश्‍वास निर्माण होणार - अनिता काळे; प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा शालेय सहकार्य उपक्रम - Rayat Samachar

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास आत्मविश्‍वास निर्माण होणार – अनिता काळे; प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा शालेय सहकार्य उपक्रम

रयत समाचार वृत्तसेवा
मिरर

अहमदनगर | वाजिद शेख | २९

    भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झालेले असताना ग्रुपच्या महिलांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले. कार्यक्रम मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी नम्रता दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, उपाध्यक्षा कविता दरंदले, दिपाली बारस्कर, शारदाताई ढवण, जीवनलता पोखरणा, रजनी भंडारी, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा, मायाताई कोल्हे, विद्या बडवे, राजश्री पोहेकर, उषा सोनटक्के, उज्वला धस, आशा गायकवाड, हिरा शहापुरे, लीला अग्रवाल, सुरेखा जंगम, अलका वाघ, सुनीता काळे, वंदना गोसावी, सुजाता कदम, सुरेखा बारस्कर, शोभा भालसिंग, उज्वला बोगावत, मोक्षदा मंगलारप, सुरेखा वाघ, शितल आवारे, योगिता वाघमारे, सविता काजळकर, सिमा घुले आदींसह महिला सदस्या, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता काळे म्हणाल्या की, जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्य वर्गातील मुले शिक्षण घेत असून, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मोठ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होतात, मात्र जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यास त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होणार आहे. जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असताना, विद्यार्थी देखील आपली गुणवत्ता सिध्द करत असल्याचे त्यांनी सांगितले.
  दिपाली बारस्कर म्हणाल्या की, प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपने जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत घेतलेला पुढाकार प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असले तरी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची सातत्याने गरज भासत असते. आजचे विद्यार्थी समाजाचे उज्वल भविष्य असून, शिक्षणातून त्यांची प्रगती साधली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
  विद्या बडवे यांनी शिक्षणाने सामाजिक परिवर्तन घडणार आहे. जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्यांच्या मुलांना घडविण्याचे कार्य सुरु आहे. स्पर्धेच्या युगात या विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांचा हातभार लागल्यास सक्षम समाजाची जडणघडण होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
जयाताई गायकवाड यांनी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्हा परिषद व मनपा शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत मागे नसून, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
 जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यासाठी विद्या बडवे, जीवनलता पोखरणा, रजनी भंडारी यांनी पुढाकार घेतला होता. तर तन्मय शिरसाठ, आर्या पुप्पाल, वैष्णवी पाठक, प्रगती पटेल, श्रेया मंगलारप, राज बेदमुथ्था, प्रणित भंडारी, पूर्वा भंडारी या विद्यार्थ्यांनी खाऊचे जमा केलेले पैसे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी दिले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. शाळेच्या वतीने ग्रुपच्या महिला सदस्यांचे आभार मानण्यात आले.
Share This Article
Leave a comment