मनपात एसीबीची मोठी कारवाई; आ. जगताप यांनी शिफारस करून आणलेल्या, प्रशासकीय आयुक्तपदाची जबाबदारी दिलेल्या डॉ. पंकज जावळेंसह शेखर देशपांडे फरार ? - Rayat Samachar

मनपात एसीबीची मोठी कारवाई; आ. जगताप यांनी शिफारस करून आणलेल्या, प्रशासकीय आयुक्तपदाची जबाबदारी दिलेल्या डॉ. पंकज जावळेंसह शेखर देशपांडे फरार ?

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी |२७.६.२०२४

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या (ACB) जालना (Jalna Acb Trap) येथील पथकाने आज मनपात मोठी कारवाई केली. नगररचना विभागाशी संबंधित प्रकरणात प्रशासकीय आयुक्त डॉ. पंकज जावळेंसह त्यांचा लिपीक टंकलेखक असलेला पीए असलेला शेखर उर्फ श्रीधर देशपांडे यांच्यावर ९ लाख ३० हजार रूपये लाचेची मागणी केल्याने कारवाई करण्यात आली. देशपांडे यास कारवाईची भनक लागल्याने तो रजेवर निघून गेला असल्याची सर्वत्र चर्चा आहे. सध्या दोघांचेही फोन नॉट रिचेबल लागत आहेत.

अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाचे आ. संग्राम जगताप यांनी प्राजक्त तनपुरे नगरविकास राज्यमंत्री असताना अकोले मनपामधे उपायुक्त असलेले पंकज जावळे यांनी मनपात आयुक्तपदी नियुक्तीची शिफारस केली होती. त्यानुसार जुलै २०२२ ला डॉ. जावळे मनपात आले तसेच नगरसेवकांचा कालावधी २७ डिसेंबर २०२३ ला संपण्याच्या एक दिवस आधी म्हणजे २६ डिसेंबरला आ.जगताप यांनी नगरविकास प्रधान सचिवांना डॉ. जावळे यांना प्रशासक पदाचा कार्यभार सुपूर्द करण्याची मागणी केली होती. आ. जगताप यांनी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची शिफारस करायला नको होती, असे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख म्हणाले.

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे दालन सील करण्यात आले आहे. त्यांच्या घराचीही तपासणी करण्यात येत असून नगरचना विभागातील अधिकाऱ्यांकडेही यासंबंधी चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
4K रियल्टी बांधकाम व्यवसायिकास नालेगाव भागातील बांधकाम परवानगी देण्यासाठी देशपांडे यांने आधी ९,३०,०००/- मागणी केलेली रक्कम तडजोडीअंती ८ लाख ठरविली होती. त्यास डॉ. जावळे यांनी प्रोत्साहन दिले होते. पडताळणी यशस्वी झाल्यावर एसीबीने कारवाई केली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम तोफखाना पोलिस स्टेशन येथे सुरू आहे.

सतत वादग्रस्त असलेल्या नगररचना विभागाशी संबंधित तक्रार मिळाल्याने ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी अधिक माहिती देण्यास पथकातील अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. या प्रकरणाची शहर व जिल्हाभर जोरदार चर्चा सुरू आहे, आधी हि अफवा असावी अशी शंका होती.

जालना एसीबीचे पोलिस उपाधिक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर एसीबी अधिक्षक संदीप आटोळे, अप्पर पो. अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली तसेच सहायक अधिकारी म्हणून शंकर मुटेकर तर सापळा पथकात गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश येते, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांचा समावेश होता.

नगररचना विभाग नेहमीच अशाच चुकीच्या कारभाराने नेहमीच चर्चेत असतो. या विभागातील अधिकारी झोपडी कँटीन परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकास ५ कोटी रूपयांच्या मनपा फसवणुकीसंबंधी गुन्हे दाखल करण्यास आर्थिक हितसंबंधातूनच टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कारवाईनंतरही नगररचना विभाग सकारात्मक काम करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन जालना
अँटी करप्शन ब्युरो, पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांनी केले तसेच सोबतच्या मो.क्र.9011125553 व
कार्यालय क्रमांक 02482-220252
टोल फ्री क्रमांक.1064 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

संबंधीत व्हिडीओ पहा – https://youtu.be/VGy-BKltfNU?si=Hx2PFj3JFC0A3b_4

Share This Article
Leave a comment