शहरात पुन्हा एकदा आमदार 'राठोड'च ? - Rayat Samachar

शहरात पुन्हा एकदा आमदार ‘राठोड’च ?

रयत समाचार वृत्तसेवा
16 / 100

ग्यानबाची मेख

शहरात पुन्हा एकदा आमदार ‘राठोड’च ?

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींसह कार्यकर्त्यांना वेध लागले आहेत विधानसभा निवडणुकीचे, महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने राष्ट्रीय भारतीय काँग्रेस, मुळ शिवसेना (ठाकरे गट) व मुळ राष्ट्रवादी (शरद पवार गट) या महाविकास आघाडीला कौल दिला. त्यातही अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघात मविआचे निलेश लंके व भाऊसाहेब वाघचौरे निवडून आले. या निकालानंतर महाराष्ट्रातील जनतेने भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना चांगलीच चपराक लगावलेली दिसून आली. निकालानंतर मविआ जोशात दिसत असली तरी विधानसभेला जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. झाले गेले विसरून महायुती कामाला लागलेली दिसून येत असली तरी विधानसभेला कोण किती जागा लढणार व लोकसभेचा पराभव यामुळे ऐन वेळी त्यांच्यातही वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहमदनगर शहरात विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन नेते मंडळी व कार्यकर्ते चांगलेच कामाला लागलेले दिसून येत आहेत. वाढदिवस, दहावे, मयतींना राजकीय मंडळींची गर्दी वाढलेली दिसत आहे. मागील दहा वर्षांपासून शहरात राष्ट्रवादीचे संग्राम अरुण जगताप हे आमदार आहेत. सध्या ते अजित पवार गटात असून राष्ट्रवादीच्या या गटाकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात कोण? हा मोठा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत अ‍ॅड. अभय आगरकर, अर्बन बँक संचालक भैय्या गंधे, जैन समाजाचे नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे तर शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते या शिवसैनिकांची नावे चर्चेत आहेत. मविआत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांची नावे चर्चेत आहेत. कळमकर यांची प्रतिमा सर्वांना समजावुन घेणारा राजकारणी अशी दिसत आहे.

ही जागा पारंपारिक पध्दतीने शिवसेना ठाकरे गटाकडे असून आ. जगताप यांच्या आधी शिवसेनेचे आमदार अनिलभैय्या रामकिसन राठोड हे सलग २५ वर्ष शहराचे आमदार होते. सर्व सामान्यांच्या मदतीला धावून येणारा मोबाईल आमदार म्हणून त्यांची ओळख होती. आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग शहर परिसर, जिल्हा व राज्यात आहे. त्याचबरोबर अहमदनगर महानगर पालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पारडे जड असून शिवसेना ठाकरे गटाकडून प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहराध्यक्ष संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे इच्छुक आहेत.

VIRAJ TRAVELS
Ad image

माविआमध्ये उमेदवारी कोणालाही मिळाली तरी उरलेल्या इच्छुकांपैकी कोण किती इमानदारीत त्या उमेदवाराचे काम करतील हे सांगणे आत्तातरी कठीण आहे. उमेदवार जाहीर करताना माविआला तारेवरची कसरत करावी लागणार यात मात्र शंका नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार शहरात परत एकदा ‘राठोड’च उमेदवार असण्याची शक्यता आहे. तशी सामान्य अहमदनगरकरांची इच्छा अनेकजण बोलून दाखवितात.

नुकतीच युवासेनेचे विक्रम राठोड यांनी मुंबईत जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी यावेळी नगर विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे हेही उपस्थित होते. विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली तर सध्याचा इच्छुकांपैकी कोणाला एकाला उमेदवारी जाहीर केल्यास दुसरा बंडखोरी करण्याची शक्यता अधिक असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाकडून शशिकला अनिलभैय्या राठोड यांना पक्षश्रेष्ठी उमेदवारी जाहीर करू शकतात. त्यांच्या नावाला पक्षांतर्गत व माविआमध्ये कोणीही विरोध करण्याची शक्यता कमी असल्याने त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता अधिक आहे.

अहमदनगरची संस्कृती महिलांना सन्मान देण्याची असून या भूमीवर अनेक कर्तृत्ववान महिलांनी राज्य केल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत.

सुलताना चाँदबीबीचा पराक्रम जगातील मोठमोठ्या सत्तांनी मान्य केला असून स्वराज्यसंकल्पक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचा पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे. भारतभर धार्मिक व सामाजिक कामांची ओळख असलेल्या सत्ताधारी माहेश्वरच्या अहिल्यामाई होळकर यांचेही जन्मस्थान अहमदनगरमधे आहे. मतदारांमधे ५०% महिला मतदार असताना महिला उमेदवार दिल्यास नक्कीच सकारात्मक निकाल मिळतील.

– तुषार सोनवणे, रयत समाचार

Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
4 Comments