पाथर्डी (राजेंद्र देवढे) १८.६.२०२४
माजी खासदार स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील यांचे नातू पुष्कर काकासाहेब पाटील व आदित्य आप्पासाहेब पाटील यांनी विधान परिषदेसाठी नाशिक विभागात शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार युवानेते विवेक कोल्हे यांच्यासाठी पाथर्डीत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांना नाशिक विभागात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीचा शब्द देऊन त्यांची नाराजी दूर केली असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसृत झाल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात मात्र विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन राजकीय धुरीणांना अचंबीत केले. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर युवा नेते विवेक कोल्हे यांची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. याच लाटेवर आरुढ होवुन त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यानुसार त्यांची प्रचार यंत्रणा सज्ज झाली असून त्याचाच परिपाक म्हणून त्यांचे माऊसभाऊ तथा स्वर्गीय खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे नातू अनुक्रमे पुष्कर पाटील व आदित्य पाटील यांनी पाथर्डी तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला. यावेळी, त्यांच्यासमवेत राजेंद्र खराद, प्रमोद खराद, किशोर पवार व त्यांच्या यंत्रणेतील शिक्षक उपस्थित होते.
विवेक भैया कोल्हे हे विजीगिषु नेते असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास पुष्कर पाटील व आदित्य पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.