टी२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये पोहोचले संघ, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक - Rayat Samachar

टी२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ मध्ये पोहोचले संघ, जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

रयत समाचार वृत्तसेवा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १८.६.२०२४

२ जूनपासून सुरू झालेल्या टी२० विश्वचषकाचा पहिला टप्पा उद्या सकाळी होणार्‍या वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याने संपणार आहे. २० संघांसह सुरू झालेली ही स्पर्धा आता ८ संघांवर आली आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका यासारखे बलाढ्य संघ बाहेर पडले आहेत, तर पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळणाऱ्या अमेरिकेने पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. आता या स्पर्धेतील सुपर-८ संघांची दोन नवीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, त्यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर बाद फेरीनंतर अंतिम सामना होईल.

भारत, अमेरिका (गट अ), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड (गट ब), अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज (गट क), दक्षिण आफ्रिका, बांगलादेश (गट ड) हे संघ सुपर-८साठी पात्र ठरले आहेत, तर पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, स्कॉटलंड, नामिबिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, ओमान, श्रीलंका, नेदरलँड आणि नेपाळ हे संघ पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. सुपर-८च्या गट-१ मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे, तर गट-२ मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

सुपर-८ फेरीत एकूण १२ सामने होतील, जे वेस्ट इंडिजच्या अँटिग्वा, बार्बाडोस, सेंट लुसिया आणि सेंट व्हिन्सेंटमध्ये खेळले जातील. भारत २० जून रोजी बार्बाडोस येथून अफगाणिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. दोन दिवसांनंतर, २२ जून रोजी, बांगलादेशशी पुढील लढत अँटिग्वामध्ये होईल. २४ जून रोजी सेंट लुसिया येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्फोटक सामना रंगणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. तर नाणेफेक साडेसात वाजता होणार आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image

स्पर्धेपूर्वी, रँकिंगमधील पहिल्या आठ संघांसाठी तयार केलेल्या सीडिंग फॉरमॅटद्वारे दोन सुपर-८ चे दोन गट पूर्व-निश्चित केले गेले होते. तथापि, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका बाहेर पडल्याने त्यांची जागा अमेरिका (अ२), अफगाणिस्तान (क१) आणि बांगलादेश (ड२) यांनी घेतली. सीडिंग फॉरमॅट गा ह्यासाठी तयार करण्यात आला होता की, जेणेकरून प्रवास करणाऱ्या चाहत्यांना साखळी सामन्यांनंतर त्यांचे आवडते संघ कुठे खेळू शकतात याची चांगली कल्पना येऊ शकेल.

सुपर-८ फेरीतील इतर सामने:-
१९ जून अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका रात्री ८ वा
२० जून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज सकाळी ६ वा
२१ जून ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश सकाळी ६ वा
२१ जून इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका रात्री ८ वा
२२ जून अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज सकाळी ६ वा
२३ जून अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सकाळी ६ वा
२३ जून अमेरिका विरुद्ध इंग्लंड रात्री ८ वा
२४ जून वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सकाळी ६ वा
२५ जून अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सकाळी ६ वा

गट-१ आणि गट-२ मधून प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि नंतर बाद फेरीनंतर अंतिम सामना होईल.

Share This Article
Leave a comment