पुणे (प्रतिनिधी) १७.६.२०२४
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन, कार्य आणि विचार वेगवेगळे करणे हे चरित्रलेखकांसाठी अवघड कामगिरी आहे. तरीही अरूणा दिवेगावकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा नेमका वेध घेतला आहे. एवढे महान कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्य-विचारांचा अन्वय त्यांनी वर्तमानाशी लावला आहे, म्हणून हे चरित्र महत्त्वाचे आहे. उच्चशिक्षितांसह सारेच लोक सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका या पलीकडे त्यांचे काय कर्तृत्व आहे हे समजूनच घेत नाहीत. त्यांच्या कर्तृत्वाचे सारेच पैलू समजून घेण्याची गरज वाटत नसावी किंवा ते समजून घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर असावे. अरूणा दिवेगावकर या मूलतः कवी आहेत. त्यांनी सावित्रीबाईचे अनंत पैलू विचारात घेऊन लेखन केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘जोतीर्मय सावित्री- एक समताधिष्ठित सहजीवन’ ही वस्तुनिष्ठ साहित्यपूर्ण पुस्तिका लिहिली. त्यातून जोतीराव-सावित्रीच्या सहजीवनाची सुंदर कहाणी मूल्यात्मकभूमिकेसह आली आहे. ‘सावित्रीबाई फुले’ या त्यांच्या चरित्रातून सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनप्रवास अरूणा दिवेगावकरांनी उलगडला आहे.
– प्रा. डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर