अहमदनगर (राजेंद्र देवढे) १३.६.२४
माझ्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर बहुतांश भाग ग्रामीण बहुल आहे. निवडणूकीदरम्यान कांद्याची निर्यातबंदी आणि दूधाची दरवाढ हे प्रश्न माझ्या निदर्शनास आले. हे ज्वलंत प्रश्न असून त्याविरोधात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचे खा. नीलेश लंके यांनी नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणूकीत यश संपादन केल्यानंतर नीलेश लंके हे सहकाऱ्यांसमवेत प्रथमच बुधवारी नवी दिल्लीत पोहचले. लंके हे देशाच्या राजधानीमध्ये पोहचल्यानंतर माध्यमप्रतिनिधींनी त्यांना गाठून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. लंके यांनी मात्र प्रत्येक प्रश्नाला मोठ्या खुबीने उत्तरे देत आपली राजकीय परीपक्वता सिध्द केली. लंके यांच्या समवेत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, प्रमोद मोहिते, डॉ. बाळासाहेब कावरे, नितिन चिकणे, सुभाष शिंदे, रामा तराळ, गौरव भालेकर, सुनील कोकरे यांच्यासह असंख्य लंके समर्थक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लंके म्हणाले, कांदा, दूध दराबरोबरच पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत. औद्योगिकरणाचे प्रश्न आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये हे प्रश्नही मी सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी दिल्ली नविनच आहे. माझ्यासाठी लोकसभेची निवडणूक अविस्मरणीय झाली. मी एकदम सर्वसामान्य कुटूंबातला असून माझ्या राजकीय प्रवास अतिशय खडतर झालेला आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच ते खासदार या पदापर्यंत पोहचण्याचा बहुमान मला या मतदारसंघातील मायबाप जनतेने दिला असल्याचे लंके यांनी सांगितले. केंद्राने बजेट सादर केले त्यात महाराष्ट्राला ८ हजार कोटी, उत्तर प्रदेश, बिहारला १५ ते २० हजार कोटी दिले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा दुजाभाव नाही का या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, दुजाभाव निश्चित आहे, मात्र मी अद्याप संसदेमध्येच गेलेलो नाही, तिथे गेल्याशिवाय या प्रश्नावर मला बोलता येणार नाही. गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी मिळते. तिथल्या कांद्याला भाव मिळतो या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, याच प्रश्नावर आता आम्हाला बोलावे लागणार आहे.
निवडणूकीदरम्यान मराठी आणि इंग्रजीचा वाद सुरू झाला होता. त्यासाठी काही धडे लावण्याचा निर्णय घेतलाय का या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, धडे लावण्याची काही गरज नाही. कोणताही माणूस त्याच्या आईच्या उदरातून शिकून येत नाही. एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतोच ना ? तशीच ही स्थिती आहे. मी दिल्लीत आलोय. जरा अंदाज घेतोय. संसद कोणत्या बाजूला आहे ? कुठून आत जायचं हेच माहीती नाही. मात्र आत गेल्यानंतर बरोबर शिकणार आहे मी. कुठल्या माणसाला कुठली भाषा अभिप्रेत आहे ? तशा भाषेतच मला बोलावे लागणार आहे. मला जो प्रश्न मांडायचा आहे त्याला माझी भाषाच समजली नसेल तर मला त्याच भाषेत बोलावे लागेल नाही. त्यासाठी ती भाषा मला शिकावी लागेल. जशास तसे उत्तर मी देऊ शकतो.
माझ्यासाठी भाग्याचा दिवस
नेते मंडळींनी माझ्यावर विश्वास टाकला. मतदारांनी तो विश्वास सार्थकी ठरविला. दिल्लीमध्ये आल्यानंतर एक वेगळं वातावरण पहायला मिळालं. कधी आपण स्वप्नात न पाहिलेली दिल्ली, आज आपल्याला प्रत्यक्षात संसदेत जाण्याचा बहुमान मिळणार आहे. माझ्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे.
त्यांच्या शुभेच्छा ग्राहय धरून काम
विरोधी उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या का ? या प्रश्नाला उत्तर देताना खा. लंके म्हणाले, अद्याप तर मला शुभेच्छा तर आलेल्या नाहीत. शुभेच्छा आल्या नसल्या तरी त्या ग्राह्य धरून पुढे काम करायचे असल्याचे लंके म्हणाले.