जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जनजागृती  - Rayat Samachar

जागतिक बाल कामगारविरोधी दिनानिमित्त जनजागृती 

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर (दत्ता वडवणीकर) १३.६.२४
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली. बालमजुरी ही एक अनिष्ट प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक समस्यांवर निगडित असल्यामुळे जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ता.१२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून देशभरात पाळला जातो. शहरातील सर्व दुकाने, गॅरेज, हॉटेल आस्थापनाधारकांना व उद्योजकांना बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेऊ नये. बालमजुरीमुळे मुलांचा शाळेत जाण्याचा हक्क हिरावला जातो आणि ते आंतरपिढीच्या गरिबीच्या चक्रातून सुटू शकत नाहीत. बालमजुरी हा शिक्षणातील मोठा अडथळा आहे, ज्यामुळे मुलांच्या शाळेतील उपस्थिती आणि कामगिरीवर विपरित परिणाम होतो, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन स्वभेट देऊन करण्यात आले.

यावेळी आस्थापनाधारक यांच्याकडून बालकामगार कामावर ठेवण्यात येणार नाहीत असे हमीपत्र घेण्यात आले. तसेच जागोजागी बालकामगार मोहीमेबाबत जनजागृतीच्या दृष्टीने स्टिकर्स लावण्यात आले, परिपत्रके वाटण्यात आली. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त नितिन कवले, शितल बांदल परिविक्षाधिन सहाय्यक कामगार आयुक्त, तुषार बोरसे सरकारी कामगार अधिकारी, सोनल काटकर, प्रगती पिसे परिविक्षाधिन सरकारी कामगार अधिकारी, अंबादास केदार, प्रकाश भोसले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, चाईल्ड हेल्पलाईन युनिटचे महेश सूर्यवंशी व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.

१४ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना कोणत्याही प्रकारच्या मजुरीसाठी कामावर ठेवणे हा गुन्हा आहे, ज्यासाठी जास्तीत जास्त २ वर्षांचा तुरुंगवास, रुपये ५० हजारापर्यंत दंड आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरांना कोणत्याही धोकादायक उद्योगधंद्यांमध्ये काम कायद्यान्वये मनाई आहे.

Share This Article
Leave a comment