पाथर्डी (राजेंद्र देवढे) १२.६.२४
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कुणाचं लक्ष नाही, हे बघून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी उरकलेल्या तीसगाव-मढी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. परंतु अल्पश: पावसाने रस्त्यावर पाणी साचल्याने अखेर या रस्त्याचे पितळ उघडे पडले आहे. याबाबत खासदार निलेश लंके येत्या आठ दिवसांत या रस्त्याची पाहणी करून ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष मरकड यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना मरकड म्हणाले की, तीर्थक्षेत्र मढी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. यात्रेदरम्यान तर सलग पंधरा दिवस लाखो भाविकांची गर्दी येथे असते. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातून मढीत येणाऱ्या भाविकांसाठी तीसगांव-मढी हा रस्ता सोयीचा आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने तो त्वरित दुरुस्त करावा अशी गेल्या दहा वर्षांपासून मागणी होती. रस्त्याला जेवढा खर्च येईल त्यापेक्षा जास्त खर्च कागदोपत्री खड्डे बुजवण्यावर झाला. पण प्रत्यक्षात रस्ता मात्र वाहतूक योग्य झाला नाही. मागील वर्षी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी प्राप्त झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याने तांत्रिक बाबीची पूर्तता न करता साईट गटर्स, पाईप टाकणे, अशा बाबी न करता थेट रस्त्यावर अखेरचा डांबरी हात मारून रस्ता पूर्ण झाल्यासारखे भासवले. सदर रस्त्याच्या कामाला लेव्हल नसल्याने, प्रत्यक्षात पावसाचे पाणी कुठून जाणार याचा विचार न करता अशा पद्धतीने रस्ता करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे अधिकारी निवडणुकीच्या धामधुमीत कामाला लागले. चार दिवसांपूर्वी या परिसरात दोन वेळा सर्वसाधारण पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर डबके साचले. त्यामुळे, डांबरासारख्या दिसणाऱ्या मुरूम व मातीचे पापुद्रे उचकटल्याने पुन्हा खड्डे पडले. साईडचे विजेचे खांबही स्थलांतरीत केले गेले नाहीत. केवळ निधी खर्ची करण्यापलीकडे दुसरा कुठलाही उद्देश हे काम करण्यामागे नव्हता. मढी येथील दर्शन सोहळा आटोपून भाविक धामणगाव देवी मार्गे मोहटा देवीला जातात. धामणगाव घाटाचे कामही अर्धवट पडले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी घाट धोकादायक बनला असून साईड गटार नसल्याने रस्त्यावरील खडे तसेच राहिल्याने वाहन चालकांना त्रास होतो. समोरून वाहन आल्यास साईड देण्यावरून वाहतूकीचा खोळंबा होतो. शासनाच्या निधीचा राजरोसपणे गैरवापर होऊनही यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे ही गंभीर समस्या व या रस्त्याच्या कामातील गैरप्रकार मांडले. मढी सारख्या देवस्थानाकडे येणाऱ्या रस्त्याला सुद्धा निकृष्टतेचे ग्रहण लागत असेल तर ही बाब गंभीर आहे, अशी भावना व्यक्त करून खासदार लंके म्हणाले की, आपण लवकरच या रस्त्याची पाहणी करून मढी देवस्थानला भेट देऊन महापूजा करू. चुकीचे काम केलेले आढळल्यास तात्काळ दखल घेतली जाईल. अशी लंके यांनी शिष्टमंडळाला सांगितल्याचे मरकड म्हणाले.