पाथर्डी तालुक्यातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने घेतली बैठक
पाथर्डी (राजेंद्र देवढे) १०.६.२४
तालुक्यातील सोशल मीडियावरील आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून मराठा वंजारी जातींमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दोन्ही जातीतील निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, चुकीच्या पद्धतीने पोस्ट कमेंट करणाऱ्या बरोबर समाज राहणार नाही तसेच चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करून तणाव निर्माण करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पोलीस स्टेशनमध्ये आयोजित बैठकीत पोलीस उपधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, मराठा जातीतर्फे विष्णुपंत अकोलकर, सचिन वायकर, पुरुषोत्तम आठरे, महेश बोरुडे, बंडू बोरुडे, रवी वायकर व अन्य तर वंजारी जातीतर्फे अर्जुन शिरसाट, अर्जुन धायतडक, माणिक खेडकर, मुकुंद गर्जे, भाऊसाहेब शिरसाठ, रणजित बेळगे व इतर कार्यकर्त्यांबरोबर आज सकाळी बैठक घेतली. सामाजिक तणाव वाढल्याने कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडू नये, समाज माध्यमावर बदनामीकारक, चारित्र्यहनन करणाऱ्या, जातीयवादाला चिथावणी देणाऱ्या व अशा स्वरूपाच्या टीकाटीपणीच्या पोस्ट, कमेंट वाढून सामाजिक तणाव विशेषत: मराठा वंजारी असा तणाव वाढू लागल्याने पोलिसांनी पुढाकार घेत बैठक घेतली व दोन्ही समाजामध्ये संवाद घडविण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणूक निकालानंतर बीड जिल्ह्यातील लोन पाथर्डी तालुक्यात पोहोचले. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तालुक्यात मराठा वंजारी जातीची संख्या तुल्यबळ असून सोशल मीडियावर दोन्ही जातीतील कार्यकर्ते विशेषत: तरुणाई आक्रमक झाली आहे. दोन दिवसापूर्वी पाथर्डी बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीची बैठक घेऊन संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला बैठकीनंतर दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे चित्रफीत काढत सर्वांना सलोख्याचे व शांततेचे आवाहन केले. पोलीस अधिकाऱ्यांतर्फे कायदेशीर बाबींची व कारवाईची माहिती देत सामाजिक तणाव वाढणार नाही यासाठी सर्वतोपरी सहकारी करावे. अपप्रवृत्ती विरुद्ध कोणताही समाज व जात म्हणून मागे उभारणार नाही, असा घेतलेला निर्णय तणाव कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. सर्वच समाज बांधवांनी जातीय तेढ, तणाव अथवा अफवा पसरवणाऱ्या विरुद्ध एकत्रित येण्याची गरज आहे. गावचे गावपण सामाजिक शांतता, उद्योग, व्यवसायाचे स्थैर्य शांततेवर अवलंबून असल्याचे सांगितले. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या कार्यकर्त्याला कोणीही पाठबळ देणार नाही असा निर्णय होत बैठक संपन्न झाली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आभार मानले.