अहमदनगर | १३ जानेवारी | प्रतिनिधी
(social) राजमाता जिजाऊ यांनी दोन छत्रपती घडवले. त्यांच्या शिकवणीमुळेच चारित्र्यसंपन्न आणि नितीवान लोककल्याणकारी राजा शिवबा घडला. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. सामाजिक समतेसाठी अशा महापुरुषांनी विचार पेरले. त्याचीच पूर्तता करण्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्यांना त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. मात्र, सध्याचा समाज प्रत्येक महापुरुषाचे जातीच्या आधारावर मूल्यमापन करून महापुरुषांचा अवमान करणार नाही याकडे आपण लक्ष द्यावे. तसेच महापुरुषांची ओळख त्यांच्यासारखे दिसून नाही, तर त्यांच्या कार्यातून व्हावी आणि यातून सुज्ञ व सजग नागरिक घडतील यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहे, असे मत आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
(social) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्ताने राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित जिजाऊ महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपट पवार होते. तर, लेखक देवा झिंजाड, राज्यशासन पुरस्कारप्राप्त लेखक नितीन थोरात, वास्तूविशारद राजशेखर कुलकर्णी, शब्दगंध साहित्यिक परिषद प्रकाशित सत्यशोधक आनंदस्वामी पुस्तकाचे सहलेखक ज्ञानदेव पांडुळे, विनोदसिंग परदेशी, जालिंदर बोरुडे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.
जिजाऊ महोत्सवाचे स्वागताध्यक्ष किसन सातपुते, लेखक सचिन मोहन चोभे, अशोक झरेकर, डॉ. योगेश पवार, गणेश सातपुते आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. आयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तर आभार महादेव गवळी यांनी मानले.
(social) पद्मश्री पोपट पवार म्हणाले, ‘जिजाऊंनी दुष्काळाची परिस्थिती अनुभवल्याने पुढील काळात दुष्काळ निवारणासाठी शिवाजी महाराजांच्याकरवी गड किल्ल्यांवर तलाव बांधले. त्याकाळी वनसंवर्धन आणि जलसंवर्धन करण्याचे काम केले. तरुणांनी आपल्या परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता, प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश निश्चित मिळते.
संवेदनशील मनाचे लेखक देवा झिंजाड यांनी आई विषयक कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. त्यांनी समाजातील वास्तवावर परखड भाष्य करून उपस्थितांची दाद मिळवली. तर, सिध्दहस्त लेखक नितीन थोरात यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील चढ उतारांच्या प्रेरणादायी कहाण्या सांगितल्या. त्यांनी आपल्या विनोदी शैलीने उपस्थितांना खळखळून हसविले.
डॉ. गाडगे, पाटील आणि लंके यांचा सन्मान
कार्यक्रमा दरम्यान बायोमी टेक्नॉलॉजीचे सीईओ डॉ. प्रफुल्ल गाडगे यांना युवा उद्योजक, कर्जत येथील कवियित्री स्वाती पाटील यांना युवा कवियित्री; तर यशोदा लंके यांना जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. निवेदक उद्धव काळापहाड यांच्या निवेदन कौशल्य, समयसूचकता आणि वैचारिक बैठक आदी गुणांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी