Sharad Pawar Speech | ज्ञान, समता आणि संस्कृती हीच महाराष्ट्राची खरी ओळख; संतांच्या विचारांचा वारसा जपण्याचे पवार यांचे आवाहन - Rayat SamacharSharad Pawar Speech संत ज्ञानेश्वर-तुकारामांच्या विचारांचा वारसा जपा; ज्ञान, समता आणि संस्कृतीवर शरद पवार यांचे भाष्य

Sharad Pawar Speech | ज्ञान, समता आणि संस्कृती हीच महाराष्ट्राची खरी ओळख; संतांच्या विचारांचा वारसा जपण्याचे पवार यांचे आवाहन

संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती, संत तुकारामांच्या ३७५ व्या स्मृतिवर्षानिमित्त सांस्कृतिक सोहळा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना शरद पवार

पिंपरी चिंचवड | २९.६ | रयत समाचार

(Sharad Pawar Speech) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गांधर्व मंच’ आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संत परंपरा, वारकरी चळवळ, शास्त्रीय संगीत आणि सामाजिक लोकशाही यांचा परस्परसंबंध उलगडत विचारमंथन केले.

(Sharad Pawar Speech) संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या स्मृतिवर्षानिमित्त तसेच गांधर्व महाविद्यालयाच्या १२५ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे महाराष्ट्राचा श्वास आहेत. त्यांच्या विचारांतून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची बीजे रुजली असून हीच मूल्ये भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत तत्त्वांमध्ये प्रतिबिंबित होतात.

(Sharad Pawar Speech) यावेळी त्यांनी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या नावाने उभारलेल्या सभागृहाचे कौतुक करत, गीतरामायणने मराठी जनमानसावर केलेल्या प्रभावाची आठवण करून दिली. गदिमांच्या कार्याला अभिवादन करत त्यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले.

Sharad Pawar Speech पिंपरी-चिंचवडमधील कार्यक्रमात संत परंपरेवर भाष्य करताना शरद पवार

शास्त्रीय संगीताच्या लोकशाहीकरणासाठी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या कार्याचे विशेष स्मरण करत पवार म्हणाले की, त्यांनी संगीताला अभिजनांच्या चौकटीतून बाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. १९०१ मध्ये स्थापन झालेल्या गांधर्व महाविद्यालयाने भारतीय संगीताच्या नवजागरणात मोठी भूमिका बजावली, असेही त्यांनी नमूद केले.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृतमधील भगवद्गीतेचे मराठी भाषांतर करून ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ हा केवळ धार्मिक संदेश नसून सर्वसमावेशक समाजव्यवस्थेची संकल्पना असल्याचे पवार यांनी सांगितले.
संत तुकारामांच्या विचारांवर भाष्य करताना त्यांनी कर्मकांड, जातीभेद आणि अन्यायाविरोधातील त्यांच्या विद्रोही भूमिकेवर प्रकाश टाकला. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अभ्यासाचा उल्लेख करत त्यांनी तुकाराम महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. तसेच, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा संदेश आजही तितकाच समर्पक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तुकाराम महाराजांनी कर्जखत इंद्रायणीत बुडवून गरिबांना कर्जमुक्त केल्याची कथा सांगताना त्यांनी शोषणमुक्त समाजव्यवस्थेची संकल्पना मांडली आणि त्यांना शेतकरी कर्जमुक्तीच्या विचाराचे प्रारंभीचे प्रेरणास्थान असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी पवार म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाची दारे खुली केली, संत तुकारामांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि गांधर्व परंपरेने कलेचे लोकशाहीकरण केले. महाराष्ट्राची खरी ओळख मंदिरांच्या कळसात नसून ज्ञान, समता, करुणा आणि संस्कृतीच्या अखंड परंपरेत आहे. या महान परंपरेचा वारसा जपण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला पाहिजे.
या सोहळ्यास साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, कलावंत अवधूत गुप्ते, खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने संगीतप्रेमी उपस्थित होते.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading