मुंबई | २३ जून | गुरुदत्त वाकदेकर
जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ आणि झुंजार लेखणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मैत्री संस्था यांच्या विशेष सहकार्याने आयोजित पत्रकारिता प्रशिक्षण कार्यशाळेचे (Journalism Workshop) उद्घाटन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात काल ता.२२ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील महापालिका मार्ग, आझाद मैदान परिसरातील या कार्यक्रमाला पत्रकार, साहित्यिक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
पूज्य सानेगुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या (Journalism Workshop) कार्यशाळेचा मुख्य उद्देश पत्रकारितेतील व्यावसायिक कौशल्यविकास, माध्यम नैतिकतेची जाणीव, सामाजिक जबाबदारीची जपणूक आणि नवोदित पत्रकारांना प्रत्यक्ष प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा होता.
हे ही वाचा : Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, लेखक व प्राध्यापक हेमंत सामंत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अक्षय आंबेडकर (राज्यशास्त्र व संविधान अभ्यासक) आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. सुमन नवलकर उपस्थित होत्या. तसेच इतिहास अभ्यासक संभाजी राजे जाधवराव, भारत सरकारच्या माजी फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर, दत्ताराम घुगे आणि संतोष आंबेकर यांनीही (Journalism Workshop) कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर, डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर, विश्वासार्ह वृत्तांकनाची आवश्यकता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. वक्त्यांनी पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, तथ्याधारित वृत्तांकन आणि माध्यम नैतिकतेचे पालन ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारितेतील कौशल्यविकासासाठी नियमित प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संविधानिक मूल्यांची जाण आणि समाजाभिमुख पत्रकारिता यावर विशेष भर देण्यात आला. कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक सक्षम होईल आणि जबाबदार पत्रकार घडण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सुरज भोईर यांनी केले, तर संतोष धुरंधर (झुंजार लेखणी) यांनी सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमाला माणुसकी फाउंडेशन, साप्ताहिक युवक आधार, मराठी साहित्य व कला सेवा तसेच विश्वांकुर यूट्यूब चॅनेल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश जाधव, संतोष खरटमोल, सूर्यकांत चव्हाण, ॲड. सोपान बुडबाडकर, विनायक जवळेकर, राजेश जाधव, घनश्याम आंबोकर, ॲड. आदिती गायकवाड, विजय काकडे, साई रामपूरकर, दिलीप गाडेकर, डॉ. संतोष कांबळे, संजय ताटे, डॉ. प्रभाकर कांबळे, विकास कदम आणि जनसेवक संतोष भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले.
पत्रकारितेतील गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सामाजिक उत्तरदायित्व अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



