Pathardi Story |...आणि पार्थ पुन्हा ढसाढसा रडला; राजेंद्र देवढे यांची 'राज की बात' वाचा - Rayat SamacharPathardi Story...आणि पार्थ पुन्हा ढसाढसा रडला | पाथर्डीच्या अवस्थेवर उपरोधिक समाजसंवाद
Ad imageAd image

Pathardi Story |…आणि पार्थ पुन्हा ढसाढसा रडला; राजेंद्र देवढे यांची ‘राज की बात’ वाचा

रयत समाचार वृत्तसेवा
8 Min Read
पाथर्डीतील ऐतिहासिक बारव आणि शहरातील अस्वच्छता व वाहतूक कोंडी Pathardi StorySubEditor | Dipak Shirasath

राज की बात | राजेंद्र देवढे, विशेष प्रतिनिधी

(Pathardi Story) पाथर्डीत पार्थ रडला, अशी आख्यायिका आहे. त्यावरुनच या शहराला पार्थरडी असे नांव पडले. त्याचा अपभ्रंश होऊन ‘पाथर्डी’ नांव रुढ झाले, असेही बोलले जाते. महाभारताचा कालखंड पाहता हा इतिहास इ.स.पूर्व हजारो वर्षांपूर्वीचा आहे. परंतु, आजही सदर आख्यायिका ताजी आहे.

 

(Pathardi Story) कुरुक्षेत्रावरील युद्धात बळी पडलेल्या सर्व योद्ध्यांना परत सदेह पृथ्वीवर आणण्याची किमया घडली होती, असे म्हणतात. युद्ध समाप्तीनंतर जेव्हा धृतराष्ट्र व गांधारी आपल्या पुत्रांच्या मृत्यूमुळे अतिशय दुःखी झाले होते, तेव्हा महर्षी वेदव्यासांनी आपल्या दिव्य आणि तपश्चर्येच्या शक्तीने हा चमत्कार घडवून आणला होता. या चकाट्यांवर विश्वास ठेवायचा ठरलाच तर, कल्पना करुयात की इंद्राच्या परवानगीने अर्जुन उर्फ पार्थ २०२६मध्ये काही दिवसांसाठी परत भारतात परतला. हस्तिनापुरात म्हणजेच सध्याच्या दिल्लीत फेरफटका मारुन झाल्यावर तो पाथर्डीला आला.

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

- Advertisement -
(Pathardi Story) पाथर्डीत आल्यावर पार्थ पुन्हा तितकाच आश्चर्यचकित झाला असावा जितका दिल्लीत आल्यावर…कारण त्याच्या काळात जे नव्हते ते बरंच काही तो याची देही याची डोळा पाथर्डीत पाहू लागला. फिरतफिरत तो त्याच बारवेजवळ आला, जिथे तो रडला होता. आज त्याच बारवेची तात्पुरती डागडुजी झालेली पाहून त्याचे मन विषन्न झाले. त्या जन्मातील त्याच्या जीवनात पाथर्डी परिसरात घडलेल्या सर्व घटना त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. युधिष्ठीर व द्रौपदीच्या कक्षात अनावधानाने प्रवेश केल्यामुळे त्याला एक वर्षाचा वनवास पत्करावा लागला होता. वनवासाच्या काळात तो तत्कालिन मणिपूर तथा आजच्या मानूर येथे येऊन पोहोचला होता. तेथे मणिपूरचा राजा चित्रवाहन याची सुपुत्री चित्रांगदा त्याच्या नजरेस पडली होती. तिचे सौंदर्य व युद्धकौशल्य पाहून तो तिच्यावर मोहित झाला होता. त्याने, तिच्या व तिच्या पित्याच्या सहमतीने तिच्याशी विवाह केला होता. काही दिवसांनी त्यांच्या पोटी पुत्र उपजला होता. त्याचे नांव बभ्रुवाहन ठेवण्यात आले होते.

हे ही पहा : ‘गुटखा तस्करां’ना मोक्का लावणार – तुकाराम मुंढे; पत्रकार परिषद व्हिडीओ पहा

चित्रवाहन राजाला पुत्रप्राप्ती झाली नसल्याने त्याने चित्रांगदालाच त्याचा उत्तराधिकारी नेमण्याचे ठरवले होते. त्यानुसार चित्रांगदा व बभ्रुवाहन मणिपूरलाच राहणार होते. वनवासाच्या उत्तरार्धात अर्जुन परत हस्तिनापूरला परतला होता. त्यानंतर काही वर्षांनी कौरवपांडवांत कुरुक्षेत्रावर निर्णायक युद्ध झाले होते. या युद्धात विजय संपादन केल्यावर युधिष्ठीर हस्तिनापूरच्या गादीवर आला होता. तत्कालिन नियमानुसार पांडवांना अश्वमेध यज्ञ करावा लागला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा भारतात सोडला होता. यज्ञाच्या नियमांनुसार बभ्रुवाहनने तो घोडा अडवला, म्हणून त्याचे रक्षण करत असताना, त्याचे बभ्रुवाहनशी युद्ध झाले होते. या युद्धात बभ्रुवाहनने, त्याचा पराभव करुन वध केला होता. तेव्हा त्याची दुसरी पत्नी उलूपीने नागमण्याच्या सहायाने त्याला पुनर्जीवित केले होते. आपण आपल्याच पित्याशी लढलो याबद्दल बभ्रुवाहनाला अत्यंत पश्चाताप झाला होता. तसेच बभ्रुवाहन आपलाच पुत्र असूनही आपण त्याच्याशी निष्ठूरपणे लढलो याचा पश्चाताप झाल्याने तोही याच बारवेच्या कठड्यावर बसून रडला होता.
हा सारा इतिहास आठवल्यावर पार्थाने त्या बारवेचे निरीक्षण केले. तिथे त्याला जुने बांधकाम न दिसता ओबडधोबड डागडुजी केलेले नवीन बांधकाम दिसले. त्याने कानोसा घेतला असता त्याला समजले की, त्याच बारवेची पडझड झाल्यानंतर, इतिहासाचे जाणकार सुनिल कदम यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कुणाला तरी या कामाचा ठेका देऊन ८०,००० रुपयांचा अपहार केला आहे.
त्याला मनस्वी चीड आली, पण तो काही करू शकत नव्हता. कारण, स्वर्गातील नियमांनुसार त्याला देह धारण करता येत नव्हता. म्हणून सूक्ष्म देहाच्या माध्यमातून तो पाथर्डी शहरात फिरत असताना त्याला उबग आला. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले पहात तो नव्यापेठेत आला. तेथे रहदारी इतकी ठप्प झाली होती की, सूक्ष्म देह असूनही त्याला धड चालताही येत नव्हते. त्या जीवघेण्या गर्दीतून तो कसाबसा वाट काढत बाजारात पोहोचला. अस्ताव्यस्त व चक्क रस्त्यावर भरलेला बाजार पाहून त्याचे मस्तक सुन्न झाले.
विमनस्क अवस्थेत पार्थ जुन्या बसस्थानक परिसरात आल्यावर त्याला उघड्यावर लघुशंकेला बसलेल्या बायाबापड्या दिसल्या. अनेक खिसेकापू सावज शोधताना दिसले. मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाटही दिसला. सवयीप्रमाणे त्याने भात्यातला बाण काढून गांडीव धनुष्यावर चढवण्याचा प्रयत्न केला, पण आपण सूक्ष्मदेहात असून निशस्त्र आहोत हे लक्षात येताच तो खिन्न मनाने तसाच तमाशा बघत राहिला. त्याकाळातील काही खाणाखुणा दिसतात का, या उद्देशाने त्याने सर्व उपनगरांत फेरफटका मारला. अनेक जागी रस्ते उकरुन पडले होते. खुल्या भुखंडांवर कचऱ्याचे ढीग जळत होते. त्याची दुर्गंधी सहन न झाल्यामुळे तो तसाच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्ककडे गेला. उत्सुकता चाळवल्याने त्याने आत प्रवेश करताच दुर्गंधीचा भपकारा आल्याने तो मूर्छित होताहोता वाचला. आत गेल्यावर त्याला एक झाकून ठेवलेला पुतळा दिसला. कानोसा घेतल्यावर त्याला समजले की तो ओबीसी नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा असून अनावरणाच्या प्रतिक्षेत थांबला आहे.
आपलाही एखादा पुतळा दिसतो का, हे पाहण्यासाठी तो संपूर्ण शहरात फिरला. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिसले. परंतु, स्वतःचा पुतळा कोठेही दिसला नाही. आपल्याच नावाने प्रसिध्द असलेल्या शहरात आपलाच पुतळा दिसू नये, याचे त्याला वैषम्य वाटले. कानोसा घेतला असता त्याला आढळून आले , त्याच्या जातीचे लोक येथे नसल्याने त्याचा पुतळा उभारण्याची कुणालाही आवश्यकता वाटली नसावी. त्याने स्वतःची जात आठवण्याचा प्रयत्न केला पण महत्प्रयासांतीही त्याला त्याची जात आठवली नाही.
आपल्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराची बकालावस्था पहातपहात तो विरंगुळा म्हणून खोलेश्वर मंदिराकडे निघाला. येताना त्याला गाढवे व डुकरेही दिसली. गायांच्या झुंडी दिसल्यानंतर क्षणभर त्याला श्रीकृष्णाची आठवण झाली. या विचारांत गढून चालत असतानाच तो एका मोठ्या खड्ड्यात पडून जखमी झाला. कुणा गुजराती ठेकेदाराने जागोजागी रस्ते खोदून ठेवल्याने त्याच्यावर ही वेळ आली होती.
कानोसा घेतला असता पार्थाला समजले की, गुजराती ठेकेदाराने सर्वांना चिरीमिरी दिल्याने त्याला कुणी काही बोलत नव्हते. आंबेडकर चौकात आल्यानंतर त्याला एक टेकडी दिसली. कुतुहल चाळवल्याने त्याने ती चढून जाण्याचा निर्णय घेतला. खड्ड्यात पडल्याने त्याचा पाय मुरगळला म्हणून त्याला वेदना होत होत्या. तो गुजराती ठेकेदार व त्याचे विनाकारण लाड पुरवणाऱ्या सर्वांची त्याला चीड आली. परंतु, तो सूक्ष्मदेहात असल्याने काहीही करू शकत नव्हता. टेकडी चढून गेल्यावर त्याला मोठमोठे जलकुंभ दिसले. काही ठिकाणी टेकडी उकरल्यामुळे त्याची उत्सुकता ताणली गेली. कानोसा घेतला असता त्याला समजले की या टेकडीचे सुशोभीकरण करायचे असल्याने ती उकरली आहे.
विचारांच्या गोंधळातच तो पोळा मारुतीचे दर्शन घेऊन खोलेश्वर मंदिराच्या वाटेने निघाला. इथून जात असताना त्याला थोडे बरे वाटले. रस्ता चांगला होता. दुतर्फा झाडीही वाढलेली पाहून तो थोडासा सुखावला. कानोसा घेतला असता त्याला समजले की माजी नगरसेवक रमेश गोरेंनी पाठपुरावा केल्यामुळे हा भाग जरासा रमणीय आहे.
खोलेश्वराचे दर्शन घेऊन परत स्वर्गात जाण्यापूर्वी, अजून काहीतरी बरे दिसेल या आशेने तो चिंचपूर रस्त्याने परत निघाला. त्या रस्त्यावरून जाताना त्याला थोडे बरे वाटत असतानाच तो शनीमारुती मंदिराच्या पुलावर आला. तेथे साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीने त्याचे डोके परत भणभणले. तसाच गेलो असतो तर बरे झाले असते, या विचारात असतानाच त्याला नदी उकरलेली दिसली. कदाचित, पावसाचं पाणी घरांत शिरू नये म्हणून त्यासाठी केली जाणारी ही पूर्वतयारी असावी, अशी स्वतःची समजूत घालत तो तसाच पुढे जाऊ लागला. थोडे अंतर चालून गेल्यावर या रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सहन न झाल्याने त्याने मनातल्या मनात प्रशासनाला चारपाच शिव्या हासडल्या. त्यामुळे, गच्च झालेले डोके थोडेसे मोकळे झाल्याचे त्याला जाणवले. मनातला विषाद कमी व्हावा म्हणून तो परत एकदा त्याच बारवेच्या कठड्यावर बसला आणि पुन्हा एकदा ढसाढसा रडला.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading