स्मृतिवार्ता | २२.३ | रसिका चावला- लायल
(World news) आज २२ मार्च २०२६ रोजी महान शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित अमरनाथ यांची १०२ वी जयंती. जगभर संगीतप्रेमींमधे साजरी होत आहे. त्यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील झंग येथे झाला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातील ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांना ‘संगीतकारांचा संगीतकार’ असे संबोधले जाते.
(World news) पंडित अमरनाथ यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण प्रो. बी.एन. दत्ता यांच्याकडून घेतले. भारताच्या फाळणीनंतर ते दिल्लीला स्थायिक झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांच्या गुरुंनी त्यांना उस्ताद अमीरखान यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला उस्ताद अमीरखान यांनी त्यांना शिष्य म्हणून स्विकारण्यास नकार दिला; मात्र अमरनाथ यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारले आणि पुढे ते त्यांच्या दृष्टीने पितृतुल्य गुरु ठरले.
(World news) पंडित अमरनाथ यांनी आठ वर्षे ऑल इंडिया रेडिओमध्ये संगीतकार म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी ‘त्रिवेणी कला संगम’चे संचालक म्हणून काम पाहिले आणि पुढे दिल्लीतील ‘श्रीराम भारतीय कला केंद्र’ येथे गुरु म्हणून कार्यरत राहिले. ‘गरम कोट’ या चित्रपटातील त्यांच्या रचनेतील मीरा भजन लता मंगेशकर यांना विशेष भावले आणि त्यांनी ते आपल्या आवडत्या गीतांच्या यादीत समाविष्ट केले.
पंडित अमरनाथ हे हार्वर्ड विद्यापीठातील फॉग आर्ट संग्रहालयात सादरीकरण करणारे पहिले भारतीय कलाकार. त्यांच्या गुरु उस्ताद अमीरखान यांच्या इंदौर घराण्याचे ते प्रमुख प्रतिनिधी मानले जातात.
ते केवळ गायक नव्हते, तर संगीतकार, शिक्षक, विद्वान आणि लेखक म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले. ‘हंसा के बेन’ हा १०१ कवितांचा संग्रह, ‘इंदौर के मसीहा’ (उस्ताद अमीरखान यांच्या आठवणी) आणि ‘हिंदुस्तानी संगीत में जीवित मुहावरे : शब्दों और शब्दावली का एक शब्दकोश’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
पंडित अमरनाथ यांची गणना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या चार महान परंपरावाहकांमध्ये होते ते म्हणजे बडे गुलामअली खान, कुमार गंधर्व आणि उस्ताद अमीरखान. त्यांनी अनेक ख्याल आणि २०० हून अधिक बंदिशी रचल्या. तसेच अमरकली, गुणरंजनी, औदव आसावरी, मारू बसंत, काफी मल्हार आणि श्याम भूप असे अनेक राग त्यांनी निर्माण केले. त्यांनी काही कर्नाटक रागांचेही हिंदुस्तानी शैलीत रूपांतर केलेले आहे.
त्यांच्या रचनांचा काही भाग नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि मुंबईतील सत्यशील देशपांडे यांच्या संभार फाउंडेशनमध्ये जतन करण्यात आला. हार्वर्ड विद्यापीठाचे स्टुअर्ट केरी वेल्श यांनी त्यांच्या विषयी म्हटले होते की, अशा उंचीवर पोहोचणारे संगीतकार जगात फारच थोडे आहेत. ‘पॅट्रिऑट’नेही त्यांना ‘विश्वकोशीय ज्ञान असलेले दुर्मिळ आणि अत्यंत बौद्धिक संगीतकार’ असे गौरविले आहे.
ता.९ मार्च १९९६ रोजी पंडित अमरनाथ यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र त्यांच्या रचना आजही रसिकांच्या हृदयाला स्पर्श करत असतात.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


