Social | फेस्कॉमचे 35 वे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात; ‘स्वामी’ संस्थेला राज्यस्तरीय सन्मान

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

नाशिक | ११.३ | गुरुदत्त वाकदेकर

(Social) महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) यांचे ३५ वे राज्यस्तरीय अधिवेशन ८ ते ९ मार्च २०२६ दरम्यान नाशिक येथील भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात राज्यभरातून मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा, हक्क आणि शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करणारी चर्चासत्रे, आरोग्यविषयक सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

(Social) अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबई परळ येथील ‘स्वामी’ संस्थेला महाराष्ट्रातील उत्कृष्ट संघ म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते आणि मुंबई फेस्कॉमचे अध्यक्ष सुरेश पोटे यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने कार्याध्यक्ष मोहन कटारे, उल्हास हरमळकर, विमल माळोदे आणि सुमंगल गुरव यांनी पुरस्कार स्वीकारला.

(Social) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी कालिकामंदिरापासून मुंबई नाका आणि बावानगर मार्गे दादासाहेब गायकवाड सभागृहापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचे नियोजन प्रभाकर क्षीरसागर यांनी केले. फेस्कॉम महाराष्ट्राचे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर अरुण रोडे आणि अशोक होळकर यांनी शपथवाचन केले.

अधिवेशनाला महापौर हिमगौरी आहेर आडके, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार राजाभाऊ बाजे, खासदार भास्करराव भगरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार सरोजिनी आहिरे, आमदार राहुल ढिकले आणि आमदार किशोर दराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आयस्कॉनचे जीवन अध्यक्ष दिगंबर ना. चापके यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. स्वागताध्यक्ष म्हणून दिनकर पाटील यांनी जबाबदारी पार पाडली, तर प्रास्ताविक अशोक तेरकर यांनी केले.

अधिवेशनात महिला विशेषांकाचे प्रकाशन, फेस्कॉमच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त निवडक महिलांचा विशेष सन्मानही करण्यात आला.

मार्गदर्शन सत्रांमध्ये विविध मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर विचार मांडले. समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांची माहिती दिली, तर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त माधवराव वाघ यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य सत्रात मानवता किम्स हॉस्पिटलचे कॅन्सरतज्ञ डॉ. राज नगरकर यांनी कॅन्सर प्रतिबंध आणि उपचारांबाबत माहिती दिली. अशोका हॉस्पिटलचे राहुल सुपे यांनी अस्थिरोगविषयक मार्गदर्शन केले.

सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सिनेकलावंत मोहन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता चतुर आणि प्रभाकर गुमास्ते यांनी केले.

दुसऱ्या दिवशी नेत्रतज्ञ डॉ. शरद पाटील यांनी नेत्रआरोग्याविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा आणि आई-वडील पालनपोषण कायदा २००७ याबाबत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलतराव जाधव यांनी माहिती दिली. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना याबाबत पंकज दाभाडे आणि अरुण रोडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

समारोप सत्रात अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. समारोपानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. यात प्रथम क्रमांकास ५,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास २,००० रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading